Khelo India Games : जलतरणात सोनेरी हॅट्ट्रिक | पुढारी

Khelo India Games : जलतरणात सोनेरी हॅट्ट्रिक

भोपाळ, वृत्तसंस्था : महाराष्ट्राच्या वेदांत माधवन, शुभंकर पत्की, अपेक्षा फर्नांडिस यांनी (Khelo India Games) सुवर्णपदकांची ‘अपेक्षा’ पूर्ण करताना सोनेरी हॅट्ट्रिकही नोंदविली. अर्जुनवीर गुप्ता या महाराष्ट्राच्या खेळाडूला मात्र कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

जलतरण स्पर्धेच्या पहिल्या दिवसाची सुरुवातच वेदांत याने मिळविलेल्या सुवर्णपदकाने झाली. मुंबईच्या या खेळाडूने 200 मीटर फ्रीस्टाईलचे अंतर एक मिनीट 55.39 सेकंदात पार केले. गतवर्षी डॅनिश खुल्या स्पर्धेत एक सुवर्ण व एक रौप्यपदक मिळविणार्‍या या खेळाडूने येथे सुरुवातीपासूनच फ्रीस्टाईलचे अप्रतिम कौशल्य दाखवीत ही शर्यत सहज जिंकली. वेदांत हा ख्यातनाम सिनेकलाकार आर. माधवन यांचा मुलगा असून, त्याने जलतरणातच करिअर करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याला सुरुवातीपासून त्याच्या पालकांकडून सातत्याने सहकार्य मिळाले आहे.

जागतिक कनिष्ठ गट स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारी मुंबईची अपेक्षा फर्नांडिस हिने शंभर मीटर्स ब्रेस्ट स्ट्रोक शर्यत एक मिनीट 13.78 सेकंदात जिंकली. तिने सुरुवातीपासून या शर्यतीत आघाडी घेतली होती. अपेक्षाने आजपर्यंत कारकिर्दीत राज्य व राष्ट्रीय स्तरावर भरघोस पदके जिंकली आहेत. (Khelo India Games)

पुण्याचा खेळाडू शुभंकर या खेळाडूने चिवट आव्हानास सामोरे जात पन्नास मीटर्स बटरफ्लाय शर्यत 25.44 सेकंदात पार केली. त्याच्यापुढे जनजॉय ज्योती हजारिका (आसाम) व श्याम सौंदर्यराजन (तामिळनाडू) यांचे आव्हान होते. तरी त्याने सुरुवातीपासूनच आश्वासक कौशल्य दाखवताना आघाडी घेतली होती आणि शेवटपर्यंत आघाडी राखत ही शर्यत जिंकली. त्यांनी याआधी कोमानांच्या राष्ट्रीय स्पर्धेतही सोनेरी वेध घेतला होता. शुभंकर हा पुण्यात भूपेंद्र आचरेकरदु तसेच दुबई येथे प्रदीप कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे.

मुलांच्या शंभर मीटर ब्रेस्ट स्ट्रोक शर्यतीत अर्जुन याला कांस्यपदक मिळाले. मुंबईच्या या खेळाडूने ही शर्यत एक मिनीट 7.29 सेकंदात पूर्ण केली.

Back to top button