मुलींच्या 4 x 400 रिलेत महाराष्ट्राला सुवर्णपदक | पुढारी

मुलींच्या 4 x 400 रिलेत महाराष्ट्राला सुवर्णपदक

भोपाळ, प्रतिनिधी : मुलींनी चार बाय चारशे मीटर रिले शर्यतीत मिळवलेल्या विजेतेपदासह महाराष्ट्राने येथील अ‍ॅथलेटिक्स शेवटच्या दिवसाची सांगता केली. त्याखेरीज महाराष्ट्राला आज महेश जाधव याने लांब उडीत रौप्यपदक, श्रावणी देसावळे हिने उंच उडीत रौप्यपदक तर रिया पाटील तिने 800 मीटर्स धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदक मिळवून दिले.

महिलांच्या रिले शर्यतीत ईशा जाधव, वैष्णवी कातुरे, रिया पाटील व अनुष्का कुंभार यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांनी सुरुवातीपासूनच घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम राखली. त्यांनी बॅटन बदलताना देखील चांगला संयम दाखविला. हे अंतर त्यांनी तीन मिनिटे 52 सेकंदांत पार केले.

श्रावणीचे उंच उडीत रौप्य यश

इस्लामपूर येथील खेळाडू श्रावणी हिने उंच उडीत 1.63 मीटर्सपर्यंत उडी घेतली. दुसर्‍या प्रयत्नात तिने हे यश संपादन केले. ती सांगली जिल्ह्यातील खेळाडू असून इस्लामपूर येथे विजयकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. खेलो इंडियातील तिचे हे पहिलेच पदक आहे. पदकाचा मला आत्मविश्वास होता, असे श्रावणीने सांगितले.

पदकाची खात्री होती : रिया

आठशे मीटर्स धावण्याच्या शर्यतीत राज्यस्तरावर अनेक पदके मिळवली होती. तसेच येथील स्पर्धेसाठी चांगला सराव केला होता त्यामुळे पदक मिळवण्याची मला खात्री होती, असे या शर्यतीत कांस्यपदक मिळवणार्‍या रिया पाटील हिने सांगितले. तिने हे अंतर दोन मिनिटे 12.56 सेकंदांत पार केले. या आधी या स्पर्धेत तिने महाराष्ट्रात चार बाय शंभर मीटर्स रिले शर्यतीत सोनेरी कामगिरी करून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला आहे. ती कोल्हापूर येथे अभिजित म्हसकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे.

Back to top button