IND vs AUS : संघ निवडताना रोहितची ‘कसोटी’ | पुढारी

IND vs AUS : संघ निवडताना रोहितची ‘कसोटी’

नागपूर, वृत्तसंस्था : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला (IND vs AUS) ऑस्ट्रेलियाविरुद्धची चार सामन्यांची कसोटी मालिका कोणत्याही किमतीत जिंकायची आहे. अशा परिस्थितीत कर्णधार रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्ध नागपुरातील पहिल्या कसोटी सामन्यात आपली सर्वोत्तम प्लेईंग इलेव्हन मैदानात उतरेल आणि प्लेईंग इलेव्हनमधील आपल्या बड्या खेळाडूंना वगळण्याची वेळ त्याच्यावर आली आहे. दरम्यान, दोन्ही संघांकडून स्लेजिंगलाही सुरुवात झाली आहे.

4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिली लढत 9 ते 13 फेब्रुवारीदरम्यान नागपुरात सकाळी 9.30 वाजता सुरू होईल. 2004 पासून ऑस्ट्रेलियाने भारतात एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही. दोन्ही देशांमधील कसोटी मालिका तब्बल सहा वर्षांनंतर भारतीय भूमीवर खेळवली जात आहे. 2017 मध्ये भारतात खेळल्या गेलेल्या शेवटच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 2-1 ने पराभव केला होता.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात के.एल. राहुलसह स्फोटक सलामीवीर आणि कर्णधार रोहित शर्मा टीम इंडियासाठी सलामी देणार आहे. रोहित शर्मा भारतीय भूमीवर अत्यंत धोकादायक आहे. अशा स्थितीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात द्विशतक झळकावण्याची ताकदही त्याच्यात आहे. पहिल्या कसोटी सामन्यात रोहित शर्मा आणि के.एल. राहुल ही सलामीची जोडी ऑस्ट्रेलियासाठी आव्हान ठरणार आहे.

चेतेश्वर पुजारा तिसर्‍या क्रमांकावर मैदानात उतरणार आहे. स्टार फलंदाज विराट कोहली चौथ्या क्रमांकावर उतरेल. शुभमन गिल पाचव्या क्रमांकावर मैदानात उतरणार आहे. सध्या शुभमन गिल एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटमध्ये जोरदार पाऊस पाडत आहे. अशा स्थितीत शुभमन गिल पहिल्या कसोटी सामन्यात 5 व्या क्रमांकावर खेळणार हे निश्चित आहे.

अशा परिस्थितीत कर्णधार रोहित शर्मा प्लेईंग इलेव्हनमधून सूर्यकुमार यादव आणि इशान किशनचा बळी देईल. अष्टपैलू रवींद्र जडेजा 6 व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरेल, जो बॉल आणि बॅटने टीम इंडियाला मजबूत करेल. स्पेशालिस्ट यष्टिरक्षक के.एस. भरत 7 व्या क्रमांकावर उतरेल. भारताच्या फिरकीपटूंना अनुकूल खेळपट्ट्यांवर टिकून राहण्यासाठी टीम इंडियाला के.एस. भरतसारख्या तज्ज्ञ यष्टिरक्षकाची गरज आहे.

खेळपट्टी फिरकीला अनुकूल (IND vs AUS)

पहिल्या कसोटी सामन्यात उपलब्ध असलेली नागपूरची खेळपट्टी फिरकीपटूंना मोठ्या प्रमाणात मदत करेल, त्यामुळे कर्णधार रोहित शर्मा अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विन या दोघांचाही प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश करू शकतात. अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विन यांच्यासोबत रवींद्र जडेजाही फिरकी गोलंदाजी करेल, तेव्हा हे तिन्ही घातक फिरकीपटू ऑस्ट्रेलियन संघाचा नाश करतील. कर्णधार रोहित शर्मा चायनामॅन स्पिनर कुलदीप यादवला प्लेईंग इलेव्हनमधून जागा देणार नाही, अशी शक्यता आहे.

Back to top button