कोल्हापूर : जुना बुधवारचा बालगोपालला धक्का | पुढारी

कोल्हापूर : जुना बुधवारचा बालगोपालला धक्का

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : बालगोपाल तालीम मंडळाला अटीतटीची झुंज देत सामना मध्यंतरापर्यंत गोलशून्य बरोबरीत ठेवल्यानंतर उत्तरार्धातील एकमेव गोलच्या जोरावर त्यांना पराभवाचा धक्का देत जुना बुधवार पेठ संघाने आघाडी मिळविली. तत्पूर्वीच्या सामन्यात झुंजार क्लबने रंकाळा तालीम मंडळाचा 4-0 असा एकतर्फी पराभव केला.

कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन आयोजित शाहू छत्रपती केएसए फुटबॉल लीग स्पर्धेच्या तिसर्‍या फेरीतील सामने मंगळवारी छत्रपती शाहू स्टेडियमवर झाले. बालगोपाल विरुद्ध जुना बुधवार पेठ यांच्यातील सामना मध्यंतरापर्यंत गोलशून्य बरोबरीत होता. उत्तरार्धात बालगोपालकडून व्हिक्टर, प्रतीक पोवार, ऋतुराज पाटील, रोहित कुरणे, अभिनव साळोखे, प्रकाश सरनाईक, सुरज जाधव यांनी गोलसाठी केलेले प्रयत्न अपयशी ठरले. जुना बुधवार पेठकडून रविराज भोसले, प्रकाश संकपाळ, आकाश मोरे, सचिन मोरे यांच्याकडून गोलसाठी प्रयत्न सुरूच होते.

51 व्या मिनिटाला त्यांची चढाई अवैधरीत्या रोखल्याने पंचांनी पेनल्टीचा निर्णय दिला. यावर रिचमाँड अवेटीने गोल नोंदवत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. ही आघाडी बालगोपालला अखेरपर्यंत कमी करता न आल्याने सामना जुना बुधवारने जिंकला. जुना बुधवारचा गोलरक्षक अब्दुल्हा अन्सारीने उत्कृष्ट कामगिरी केली.

झुंजार क्लबचा विजयी चौकार

झुंजार क्लबने रंकाळा तालीम मंडळाचा 4-0 असा एकतर्फी पराभव केला. 7 व्या मिनिटाला राजेश बोडेकरने, 19 व्या मिनिटाला कार्लोस नाला, 40 व्या मिनिटाला राजेश बोडेकर व 62 व्या मिनिटाला थॉमस गोम्स यांनी गोल केले. त्यांच्या समर्थ नावले, शाहू भोईटे, प्रथमेश बाटे यांनी उत्कृष्ट खेळ केला. रंकाळाकडून देवराज मंडलिक, हर्ष जरग, निनाद चव्हाण यांनी केलेल्या प्रयत्नांना अपयश आले.

Back to top button