Khelo India Youth Games : खो-खो मध्ये डबल धमाका | पुढारी

Khelo India Youth Games : खो-खो मध्ये डबल धमाका

जबलपूर, वृत्तसंस्था : चार वेळच्या किताब विजेत्या महाराष्ट्र महिला व पुरुष खो-खो संघांनी आपले वर्चस्व अबाधित ठेवत खेलो इंडिया युथ गेम्समध्ये (Khelo India Youth Games) मंगळवारी विजयाचा डबल धमाका केला. महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी पाचव्या सत्रातील खेलो इंडिया या स्पर्धेत सलग दोन विजय साजरे केले आहेत. जानकी पुरस्कार विजेत्या जान्हवी पेठेच्या नेतृत्वात राष्ट्रीय खेळाडू प्रीती काळे, निशा वैजल, वृषाली, प्रतीक्षा आणि पायल यांनी सर्वोत्तम कामगिरी करत महाराष्ट्र महिला संघाला मोठा विजय मिळवून दिला.

महाराष्ट्र महिला संघाने यजमान मध्य प्रदेशला 1 डाव 12 गुणांनी पराभूत केले. त्या पाठोपाठ नरेंद्रच्या नेतृत्वात महाराष्ट्र पुरुष संघाने यजमान मध्य प्रदेशला 1 डाव व 6 गुणांनी धूळ चारली. त्यामुळे यजमान मध्य प्रदेश संघांना घरच्या मैदानावर लागोपाठ पराभवाचा धक्का सहन करावा लागला. आपली मोहीम कायम ठेवत महाराष्ट्र संघांनी गटात दोन विजय संपादन केले आहेत.

प्रतीक्षा, पायल, निशाची कामगिरी लक्षवेधी (Khelo India Youth Games)

महाराष्ट्र महिला संघाची विजयी घोडदौड कायम ठेवण्यासाठी प्रतीक्षा, पायल, निशा यांची कामगिरी लक्षवेधी ठरली. त्यामुळे महाराष्ट्र संघाला डावाने विजयाची मोहीम कायम ठेवता आली. यादरम्यान प्रतीक्षाने अडीच मिनिटे सर्वोत्कृष्ट संरक्षण केले. तसेच तिने दोन गुण संपादन केले. त्या पाठोपाठ पायलने दोन मिनिटे पळती करत 16 गुणांची कमाई केली. सोलापूरच्या प्रीती काळेने संघाच्या विजयात सहा गुणांचे योगदान दिले. तसेच नाशिकच्या निशाने दोन मिनिटे संरक्षण केले. कल्याणीने आठ गुण आणि वृषालीने सहा गुण संपादन केले. त्यामुळे महाराष्ट्र संघाला एक डाव बारा गुणांनी विजय साजरा करता आला.

गतविजेत्या महाराष्ट्र पुरुष संघाचे विजयात वैभव, निखिल, गणेश, सचिन यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली. त्यामुळे महाराष्ट्र संघाला यजमान मध्य प्रदेशवर डावाने विजय संपादन करता आला. यादरम्यान वैभवने नाबाद एक मिनिट वीस सेकंद खेळी करत दोन गुण संपादन केले. त्या पाठोपाठ निखिलने 1 मिनिट 20 सेकंदाची चमकदार कामगिरी करत सहा गुण संपादन केले. तसेच सचिनने चार गुण आणि रुपेशने सहा गुण मिळवत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. त्यामुळे नरेंद्रच्या नेतृत्वात महाराष्ट्र संघाला आपले वर्चस्व अबाधित ठेवता आले.

Back to top button