टेबल टेनिसमध्ये महाराष्ट्राचे चार खेळाडू बाद फेरीत | पुढारी

टेबल टेनिसमध्ये महाराष्ट्राचे चार खेळाडू बाद फेरीत

इंदूर, वृत्तसंस्था : महाराष्ट्राच्या जश मोदी याने पुरुष गटात तर रिषा मीरचंदानी, पृथा वर्टीकर व तनिषा कोटेचा यांनी बाद फेरीत प्रवेश करीत टेबल टेनिसमध्ये महाराष्ट्राचे आव्हान कायम राखले. स्पर्धेतील पुरुषांच्या गटात मोदी याने सायंकाळच्या सत्रात धैर्य तांडेल यांचा 11-4,11-3,11-8 असा पराभव केला.

महिलांच्या गटात रिषा हिने अनुष्का चौहान हिचा 11-1, 11-1, 11-1 असा धुव्वा उडविला. पृथा हिने हरियाणाच्या सुहाना सैनी हिला 5-11, 3-11,11-8,11-8,11-1 असे चिवट लढतीनंतर पराभूत केले. तनिशा हिने अरुणाचल प्रदेश संघाच्या अवेमी मिहू हिला 11-3, 11-3, 11-3 असे निष्प्रभ केले. जेनिफर हिला मात्र साखळी गटातच पराभूत व्हावे लागले.

सकाळच्या सत्रात पुरुषांच्या गटात जश मोदी याने बंगालच्या सौम्यदीप सरकार याच्या विरुद्ध 7-11, 12-10, 12-10, 11-8 असा संघर्षपूर्ण विजय मिळविला. महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारा पुण्याचा खेळाडू नील मुळ्ये याने अरुणाचल प्रदेशच्या तेफर मौफ याचा 11-2, 11-5, 11-1 असा दणदणीत पराभव केला. त्याने परतीच्या फटक्यांचा बहारदार खेळ केला.

महिलांच्या गटात महाराष्ट्राला संमिश्र यश लाभले. पदकाची दावेदार असलेल्या पृथा वर्टीकर हिने पश्चिम बंगालच्या जौरीदोर ओशिकी हिचा 11-5, 11-7, 6-11,8-11,11-4 असा पराभव केला. पहिल्या दोन गेम जिंकल्यानंतर पृथाने नंतरच्या दोन गेम गमावल्या. त्यामुळे निर्णायक गेम विषयी उत्सुकता निर्माण झाली. या गेममध्ये मात्र पृथाने तिच्या नावलौकिका साजेसा खेळ करत सामना जिंकण्यात यश मिळविले. महाराष्ट्राच्या रिशा मीरचंदानी हिने आव्हान राहताना कर्नाटकच्या अर्णया मंजुनाथ हिला 11-9, 7-11, 11-8, 11-9 असे पराभूत केले. तनिशा कोटेचा हिने दिल्लीच्या लक्षिता नारंग हिच्यावर 11-8, 10-12,11-7,11-8 अशी मात करताना काउंटर अटॅक पद्धतीचा सुरेख खेळ केला. महाराष्ट्राच्या जेनिफर वर्गीस हिला मात्र पराभवास सामोरे जावे लागले.

Back to top button