पुढारी ऑनलाईन डेस्क : Women IPL Teams Bid : 25 जानेवारी 2023 हा दिवस बीसीसीआयसाठी ऐतिहासिक ठरला आहे. महिला आयपीएलच्या पाच संघाची तब्बल 4669.99 कोटी रुपयांना (अंदाजे 4670 कोटी रुपये) विक्री झाली असून बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी यासंदर्भात ट्विट करत ही माहिती दिली.
महिला इंडियन प्रीमियर लीग (WIPL) चा पहिला हंगाम लवकरच सुरू होणार आहे. पहिल्या सत्रात पाच संघ असतील. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) यातील पाचही संघांची विक्री करून कोट्यवधींची कमाई केली आहे. या पाच संघांच्या विक्रीरून बीसीसीआयला 4669.99 कोटी रुपये मिळाले आहेत, अशी माहिती सचिव जय शहा यांनी ट्विट करून दिली. त्यांनी महिला आयपीएलचे अधिकृत नाव आता महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) असे बदलून सलग तीन ट्विट केले आहेत.
महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सत्रात मुंबई, अहमदाबाद, बंगळूर, लखनौ आणि दिल्ली हे पाच संघ खेळतील. त्यांचा लिलाव करण्यात आला आहे. यातील अहमदाबाद संघासाठी अदानी समूहाने सर्वाधिक बोली लावली. तर मुंबईचा संघ रिलायन्स ग्रुपशी सलग्न असणा-या इंडियाविन स्पोर्ट्सने विकत घेतला आहे. म्हणजेच यावेळी महिलांच्या आयपीएलमध्ये चाहत्यांना अदानी ग्रुप आणि रिलायन्स ग्रुपचे संघ आमनेसामने दिसणार आहेत.
1. अदानी स्पोर्ट्सलाइन प्रा. लि. : अहमदाबाद : 1289 कोटी रु.
2. इंडियाविन स्पोर्ट्स प्रा. लि. (रिलायन्स ग्रुप) : मुंबई : 912.99 कोटी रु.
3. रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्स प्रा. लि. : बंगळूर : 901 कोटी रु.
4. JSW GMR क्रिकेट प्रा. लि. : दिल्ली : 810 कोटी रु.
5. कॅप्री ग्लोबल होल्डिंग्ज प्रा. लि. : लखनौ : 757 कोटी रु.