पुढारी ऑनलाईन डेस्क : Shubman Gill Rankings : टीम इंडियाचा सलामीवीर शुभमन गिलने आयसीसी वनडे क्रमवारीत धमाल केली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत द्विशतक आणि एका शतकासह एकूण 360 धावा फटकावणा-या या युवा फलंदाजाने विराट कोहली, रोहित शर्मा यांना मागे टाकले असून तो पहिल्यांदाच टॉप 10 फलंदाजांच्या यादीत प्रवेश करण्यात यशस्वी झाला आहे. मागील क्रमवारीत अव्वल 20 मध्येही नसलेल्या गिलने आता थेट सहाव्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
दोन आठवड्यांपूर्वी श्रीलंकेविरुद्धच्या वन-डे मालिकेत उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर गिलने वन-डे क्रमवारीत 26 वा क्रमांक मिळवला होता. त्यानंतर आता, न्यूझीलंडविरुद्ध 180 ची सरासरी आणि 128 च्या स्ट्राइक रेटसह या 23 वर्षीय फलंदाजाने 360 धावा आपल्या खात्यात जमा केल्या. त्याने 'प्लेअर ऑफ द सिरीज' पुरस्कार जिंकला आणि वन-डे क्रमवारीत सहाव्या स्थानावर 20 स्थानांनी झेप घेतली.
शुभमनने आतापर्यंत फक्त 21 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 73.76 च्या सरासरी आणि 109.80 च्या स्ट्राइक रेटने 1254 धावा केल्या. वन-डेत सर्वात जलद एक हजार धावा पूर्ण करणारा तो भारतीय फलंदाज आहे. आतापर्यंतच्या कारकिर्दीत गिलने एका शतकासह शतकांचा चौकार लगावला आहे.
विराट कोहलीला वन-डे क्रमवारीत फटका बसला असून त्याची सातव्या स्थानावर घसरण झाली आहे. तर इंदूर वन-डेत झळकावणा-या कर्णधार रोहित शर्माला फायदा झाला आहे. किवींविरुद्धच्या मालिकेपूर्वी तो वनडे क्रमवारीत 10 व्या स्थानावर होता. आता तो स्टीव्ह स्मिथसोबत संयुक्तपणे आठव्या क्रमांकावर पोहोचला आहे.
पाकिस्तानचा बाबर आझम (887) वनडे फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. दुस-या आणि तिस-या स्थानी द. आफ्रिकेचे अनुक्रमे रॉसी व्हॅन डर ड्युसेन (766) आणि क्विंटन डिकॉक (759) आहेत. यानंतर डेव्हिड वॉर्नर (747), इमाम-उल-हक (740), शुभमन गिल (734), विराट कोहली (727), स्टीव्ह स्मिथ (719), रोहित शर्मा (719) आणि जॉनी बेअरस्टो (710) यांचा समावेश आहे.