आयपीएलच्या आजच्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्यात आर. अश्विनने कमाल केली. या सामन्यात त्याने फक्त २० धावा देत १ बळी टिपला. मात्र ही डेव्हिड मिलरची मिळवलेली विकेट त्याच्या टी २० कारकिर्दितील एक माईल स्टोन विकेट ठरली.
टी २० मध्ये आर. अश्विनने कमाल केली. त्याने आपल्या २५० विकेट पूर्ण केल्या. यापूर्वी भारताकडून अमित मिश्रा आणि पियुष चावलाने टी २० मध्ये २६२ विकेट घेतल्या आहेत. विशेष म्हणजे अश्विनने आपला टी २० मधील २५० वा बळी हा २५० व्या सामन्यात टिपला.
टी २० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट मिळवण्याचा विक्रम हा ड्वेन ब्रोव्होच्या नावावर आहे. त्याने आतापर्यंत ५४६ विकेट घेतल्या आहेत. त्यानंतर इम्रान ताहिरने ४२० विकेट घेतल्या आहेत. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर सुनिल नारायण आहे. त्याने टी २० मध्ये आतापर्यंत ४१३ विकेट घेतल्या आहेत. टी २० स्पेशलिस्ट गोलंदाज म्हणून ओळख असलेल्या लसिथ मलिंगानेही ३९० विकेट घेतल्या आहेत. याच यादीत आपल्या ६ वर्षाच्या टी २० कारकिर्दित तब्बल ३८५ विकेट घेणारा राशिद खान हा पाचव्या स्थानावर आहे.
आपीएलच्या आजच्या सामन्यात दिल्लीने राजस्थानचा ३३ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्लीने २० षटकात ६ बाद १५४ धावा केल्या. दिल्लीकडून श्रेयस अय्यरने सर्वाधिक ४३ धावा केल्या. राजस्थानकडून मुस्तफुजूर आणि साकरिया यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या.
दिल्लीचे १५५ धावांचे आव्हान पार करण्यासाठी मैदानात उतरलेल्या राजस्थानला २० षटकात ६ फलंदाजांच्या मोबदल्यात १२१ धावांपर्यंतच मजल मारता आली. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने एकाकी झुंज देत ५३ चेंडूत नाबाद ७० धावांची खेळी केली. मात्र दुसऱ्या बाजूने त्याला योग्य अशी साथ मिळाली नाही.