DCvsRR Live : सॅमसनची ‘संथ’ अर्धशतकी खेळी व्यर्थ, दिल्ली टॉपवर

DCvsRR Live : सॅमसनची ‘संथ’ अर्धशतकी खेळी व्यर्थ, दिल्ली टॉपवर
Published on
Updated on

दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स ( DCvsRR ) यांच्यातील सामन्यात दिल्लीने राजस्थानचा ३३ धावांनी पराभव केला. राजस्थानकडून कर्णधार संजू सॅमसनने एकाकी झुंज देत ५३ चेंडूत ७० धावांची नाबाद अर्धशतकी खेळी केली. मात्र सॅसमनने आपल्या खेळीची सुरुवात संथ केली होती. तसेच दुसऱ्या बाजूने त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. दिल्लीकडून नॉर्खियाने चांगला मारा केला. त्याने १८ धावात दोन बळी टिपले.

दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स ( DCvsRR ) यांच्यातील आजच्या सामन्यात दिल्लीने दिलेले १५५ धावांचे आव्हान पार करण्यासाठी उतरलेल्या राजस्थानला पहिल्याच षटकात धक्का बसला. आवेश खानने लिम लिव्हिंगस्टोनला एका धावेवर माघारी धडाले. त्यानंतर दिल्लीची तेजतर्रार तोफ नॉर्खियाने दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर यशस्वी जयस्वालला ५ धावांवर बाद करुन राजस्थानला दोन षटकात दोन धक्के दिले.

पाठोपाठच्या या दोन धक्यातून राजस्थानला संजू सॅमसन आणि डेव्हिड मिलर यांनी सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र अनुभवी आर. अश्विनने मिलरला ७ धावांवर बाद करत राजस्थानला पॉवर प्लेमध्येच तिसरा धक्का दिला. त्यामुळे राजस्थानला पॉवर प्लेमध्ये २१ धावांपर्यंतच मजल मारता आली.

राजस्थानची संथ फलंदाजी ( DCvsRR )

कर्णधार संजू सॅमसन आणि त्याला साथ देण्यासाठी आलेल्या महिपाल लोमरोर यांनी सावध फलंदाजी केली. या दोघांनी संघाला १० षटकात ४८ धावांपर्यंत पोहचवले. मात्र त्यानंतर धावगती वाढवण्याचा दबाव वाढू लागल्यावर महिपाल १९ धावांवर बाद झाला. त्याला रबाडाने बाद केले.

त्यानंतर संजू सॅमसनने धावांची गती वाढवण्यास सुरुवात केली. मात्र त्याला साथ देण्यासठी आलेला रियान पराग अवघ्या २ धावा करुन अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर बाद झाला. पराग बाद झाल्यानंतर आलेल्या राहुल तेवतियानेही सेट होण्यासाठी वेळ घेतला.

अखेर सॅमसनने गिअर बदलला ( DCvsRR )

दरम्यान, सॅमसनने धावांची गती वाढवण्यासाठी मोठे फटके मारण्यास सुरुवात केली. त्याने संघाला १५ व्या षटकात ८२ धावांपर्यंत पोहचवले. सॅमसनने आपले अर्धशतक ३९ चेंडूत पूर्ण केले. अखेर १७ व्या षटकात राजस्थानने आपले शतक धावफलकावर लावले. आता राजस्थानला विजयसाठी १८ चेंडूत ५६ गरज होती.

मात्र नॉर्खियाने तेवातियाला ९ धावांवर बाद केले. त्यानंतर राजस्थानची धावगती अजूनच मंदावली. अखेर राजस्थानला अखेरच्या षटकात ४५ धावांचे अशक्यप्राय आव्हान पार करायचे होते. मात्र त्यांना  २० षटकात ६ बाद १२१ धावांपर्यंतच मजल मारता आली.

तत्पूर्वी, आयपीएलच्या १४ व्या हंगामात आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स ( DCvsRR ) यांच्यात सामना रंगणार आहे. राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार संजू सॅमसनचा हा निर्णय कार्तिक त्यागी आणि चेतन साकरियाने सार्थ ठरवत दोन्ही सलामीवीरांना स्वस्तात माघारी धाडले.

कार्तिक त्यागीने शिखर धवनचा ८ धावांवर त्रिफळा उडवला तर चेतन साकरियाने पृथ्वी शॉला १० धावांवर बाद केले. दिल्लीला पाठोपाठ दोन धक्के बसल्याने पॉवर प्लेमध्ये त्यांच्या धावगतीला खिळ बसली. त्यांना ६ षटकात ३६ धावांपर्यंतच मजल मारता आली.

आजी – माजी कर्णधारांची अर्धशतकी भागीदारी ( DCvsRR )

पॉवर प्लेमध्ये पिछाडीवर पडलेल्या दिल्लीला सावरण्यासाठी दिल्लीचा माजी कर्णधार श्रेयस अय्यर आणि आजी कर्णधार ऋषभ पंत यांनी कंबर कसली. या दोघांनी धावांची गती वाढवण्याचा प्रयत्न करत ९ षटकात संघाचे अर्धशतक धावफलकावर लावले. अय्यर आणि पंतने तिसऱ्या विकेटसाठी नाबाद अर्धशतकी भागीदारी रचली.

या दोघांच्या भागीदारीमुळे दिल्लीने १० षटकात ७५ धावांचा टप्पा पार केला. ही जोडी दिल्लीला चांगली धावसंख्या उभारुन देणार असे वाटत असतानाच मुस्तफिजूरने दिल्ली कर्णधार ऋषभ पंतचा २४ धावांवर त्रिफळा उडवून दिला. यामुळे ६१ धावांची भागीदारी करणारी अय्यर – पंत जोडी फुटली.

पंत बाद झाल्यानंतर अय्यरवर दिल्लीचा डाव पुढे नेण्याची जबाबदारी आली. मात्र अर्धशतकाजवळ पोहचलेल्या अय्यरला राहुल तेवातियाने ४३ धावांवर बाद करत दिल्लीला चौथा धक्का दिला. श्रेयस अय्यर बाद झाल्यामुळे दिल्लीचे शिमरोन हेटमायर आणि ललीत यादव हे दोन नवे फलंदाज क्रिजवर होते.

हेटमायरची हिटिंगही आली संपुष्टात ( DCvsRR )

या दोघांनी १५ व्या षटकात दिल्लीचे शतक धावफलकावर लावले. अखेरची काही षटके राहिली असताना हेटमायरने आक्रमक फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. त्याने दिल्लीची धावसंख्या झपाट्याने वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र मुस्तफिजूरने त्याला २८ धावांवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

हेटमायर बाद झाल्यानंतर अक्षर पटेल आणि जयंत यादव यांनी दिल्लीच्या धावसंख्येला टेकू देण्याचा प्रयत्न केला. अखेर दिल्लीने १५० धावांचा टप्पा पार केला. दिल्लीने २० षटकात ६ बाद १५४ धावांपर्यंत मजल मारली.

[box type="shadow" align="" class="" width=""][visual_portfolio id="40771"][/box]

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news