IND vs SL : सूर्याच्या तेजाने लंका दहन; भारताचा श्रीलंकेवर २-१ ने मालिका विजय | पुढारी

IND vs SL : सूर्याच्या तेजाने लंका दहन; भारताचा श्रीलंकेवर २-१ ने मालिका विजय

राजकोट; वृत्तसंस्था : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन टी-20 सामन्यांपैकी तिसरा सामना राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला गेला. टीम इंडियाने हा सामना 91 धावांनी जिंकून मालिका 2-1 अशी जिंकली. मुंबईतील पहिला टी-20 सामना भारताने जिंकला. त्यानंतर पुण्यातील दुसरा सामना जिंकून श्रीलंकेने मालिकेत पुनरागमन केले. लंकन संघाला पुण्यातील कामगिरीची पुनरावृत्ती राजकोटमध्ये करता आली नाही आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. उपकर्णधार सूर्यकुमार यादव हा या सामन्याचा हिरो ठरला. त्याने टी-20 तील तिसरे शतक झळकावले. अक्षर पटेलला मालिकावीर, तर सूर्यकुमार यादवला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला. (IND vs SL)

सामन्यात नाणेफेक जिंकताच हार्दिकने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. इशान किशन पहिल्याच षटकात बाद झाला, पण त्यानंतर राहुल त्रिपाठीने मात्र हार्दिकचा निर्णय योग्य ठरवला. नवख्या राहुल त्रिपाठीने 16 चेंडूंत तुफानी 35 धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादवने दमदार खेळीला सुरुवात केली. शुभमन गिलच्या साथीने त्याने अर्धशतकी भागीदारी केली. त्यानंतरही तो फटकेबाजी करतच राहिला. शुभमन गिल अर्धशतकाच्या जवळ पोहोचला, पण त्याला 44 धावांवर हसरंगाने माघारी धाडले. त्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्या मोठा फटका मारताना 4 धावांवर बाद झाला. पाठोपाठ दीपक हुडादेखील 4 धावांवरच बाद झाला. (IND vs SL)

हे  दोघेही स्वस्तात बाद झाले, पण सूर्यकुमारने मात्र फटकेबाजी बंद केली नाही. त्याने वार्‍याच्या वेगाने बॅट फिरकवत आपले तिसरे आणि भारतीय फलंदाजाकडून यंदाच्या वर्षातील पहिले टी-20 शतक ठोकले. त्याने 45 चेंडूंत 100 धावा केल्या. अक्षर पटेलनेही चांगली फटकेबाजी केली. त्याने 9 चेंडूंत 4 चौकारांसह नाबाद 21 धावा कुटल्या. त्यानंतर सूर्यकुमार यादवने नाबाद 112 धावा करत संघाला 228 धावांची मजल मारून दिली. सूर्याने 7 चौकार आणि 9 षटकार खेचले.

आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. त्यानंतर त्यांना सावरताच आले नाही. पाथुम निसांका 15 धावांवर बाद झाला. कुसल मेंडिस देखील 23 धावा काढून माघारी परतला. या दोघांच्या बाद होण्यानंतर श्रीलंकेच्या डावाला गळतीच लागली. अविष्का फर्नांडो 1 धाव काढून बाद झाला. धनंजय डिसिल्वाने 22, चरिथ असालंकाने 19, दासुन शनाकाने 23 धावा करत संघर्ष करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचे प्रयत्न तोकडे पडले. हसरंगा 9 धावांवर, करुणारत्ने शून्यावर, महेश तिक्षणा 2 धावांवर तर मदुशंकाने 1 धाव काढून बाद झाला. शेवटी त्यांचा संपूर्ण संघ 16.4 षटकांत 137 धावांत गारद झाला. अर्शदीपने 3 तर उमरान मलिक, हार्दिक पंड्या, यजुवेेंद्र चहल यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक :

भारत : 20 षटकांत 5 बाद 228 धावा. (सूर्यकुमार यादव नाबाद 112, शुभमन गिल 46. दिलशान मदुशंका 2/55, कासून रजिथा 1/35.)
श्रीलंका : 16.4 षटकांत सर्वबाद 137 धावा. (कुशल मेेंडिस 23, दासून शनाका 23.अर्शदीप सिंग 3/20, यजुवेंद्र चहल 2/30. हार्दिक पंड्या 2/30.)

हेही वाचा; 

Back to top button