United Cup Tennis : अमेरिका, इटली अंतिम फेरीत | पुढारी

United Cup Tennis : अमेरिका, इटली अंतिम फेरीत

युनायटेड कप टेनिस (United Cup Tennis) स्पर्धेत सिडनी ऑलिम्पिक पार्कच्या केन रोजवाल टेनिस स्टेडियममध्ये अमेरिकेच्या टेलर फ्रीटजने पोलंडच्या हुबर्ट हरकाझचा अटीतटीच्या लढतीत 7-6, 7-6 असा पराभव केला. हाच कित्ता गिरवत मॅडिसन कीजने पोलंडच्या लीनेटला 6-4, 6-2 अशी धूळ चारली.

दोन संघांतील शेवटच्या, मिश्र दुहेरीच्या सामन्यात अमेरिकेच्या पेगुला आणि फ्रीटज जोडीने पोलंडच्या रोसोलस्का व कुबॉट यांचा 6-7, 6-4, 10-6 असा फडशा पाडून अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. अमेरिकेने पाचही सामने जिंकून पोलंड संघास पुरते निष्प्रभ केल्याचे चित्र पाहायला मिळाले.

दणदणीत विजयाबाबत प्रतिक्रिया देताना जेसीका पेगुला म्हणाली, 5-0 असा विजय मिळविणे सोपे नव्हते. आम्ही संघ म्हणून एकोप्याने आणि पूरकपणे खेळलो. अर्थातच अंतिम सामना देखील जिंकण्यासाठी उत्सुक आहोत. दुसर्‍या उपांत्य फेरीतील ग्रीस वि. इटली सामन्यातील पहिल्या लढतीत दोन तगड्या खेळाडूंतील लढत प्रेक्षणीय झाली. (United Cup Tennis)

ग्रीसच्या स्तिफनोस स्तितीपासने मॅटओ बेरेट्टिनीचा 4-6, 7-6, 6-4 असा पराभव करण्यात यश मिळविले; परंतु नंतर इटलीच्या लुसिया ब्रॉनझेटी हिने ग्रीसच्या व्हेलन्टिनी ग्रामट्टीकोपो हिला 6-2, 6-3 असे हरवून इटलीचा अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित केला. आज अंतिम सामना असून 18 देशांच्या सांघिक विजेतेपणाचा बहुमान कोण पटकावेल हे सिद्ध होईल.

उदय बिनीवाले

Back to top button