संघातून वगळल्याने आणखी स्ट्राँग झालो : श्रेयस अय्यर | पुढारी

संघातून वगळल्याने आणखी स्ट्राँग झालो : श्रेयस अय्यर

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारतीय संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरने गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियन भूमीवर खेळल्या गेलेल्या आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 मध्ये खेळू न शकल्याने निराशा व्यक्त केली आहे. या मोठ्या स्पर्धेत आपले नाव न दिसल्याने खूप निराश झाल्याचे त्याने म्हटले आहे, पण यातून धडा घेतला आणि आपले क्रिकेट सुधारण्यासाठी सराव सुरूच ठेवला. यातून मी आणखी स्ट्राँग झालो, असेही तो म्हणाला.

मात्र, अय्यरला टी-20 विश्वचषक 2022 साठी राखीव खेळाडू म्हणून नियुक्त करण्यात आले होते. संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना, अय्यरने कबूल केले की भारताच्या टी-20 विश्वचषक 2022 च्या संघात स्थान न मिळाल्याने तो निराश झाला होता. श्रेयसने नेहमी आपल्या देशाचे सर्वात मोठ्या स्पर्धेत प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न पाहिले होते, पण ही संधी जरी मिळाली नसली तरी त्यामुळे तो खचून गेला नाही.

श्रेयस अय्यरने एका इंग्रजी दैनिकाशी बोलताना सांगितले की, विश्वचषकात निवड न होणे हे माझ्यासाठी निराशाजनक होते. सर्वात मोठ्या स्टेजवर आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न मी लहानपणीच पाहिले होते. संघासाठी जिंकणे ही देखील एक गोष्ट आहे जी तुम्हाला समाधान देते. परिपूर्ण बनवते. पण मी पूर्णपणे खचलो नाही. मी माझ्या मनात कोणत्याही प्रकारची नकारात्मक भावना किंवा विचार येऊ दिले नाही.

अय्यर म्हणाला, जेव्हाही मी नेटमध्ये किंवा सामन्यात फलंदाजी करतो तेव्हा मी असाच विचार करतो. जेव्हा मी किलबिलाट करणार्‍या विरोधकांविरुद्ध खेळत असतो, तेव्हा मला ती टीका चांगली खेळी करून परतवून लावायला आवडते. कारण मला वाटते की ते फक्त माझी लय बिघडवण्यासाठी केले जाते; मात्र मी त्यावर दुर्लक्ष करून पुढे जातो.

कुटुंबाशी संवाद साधल्याने मन खंबीर होते

दबावात खेळण्याबाबत श्रेयस म्हणतो, दबावात असताना तुमच्याकडून सर्वोत्तम खेळी खेळण्यासाठी मदत होते आणि मला ते करायला आवडते. जेव्हा जेव्हा मला बरे वाटत नाही तेव्हा मी कुटुंब आणि मित्रांशी संवाद साधतो, माझे मन क्रिकेटपासून दूर राखण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून परत येताना मी मजबूतरीत्या परत येऊ शकतो. या छोट्या पैलूंवर मी लक्ष केंद्रित करतो जे माझ्यासाठी खूप चांगले चालले आहे.

टीकेमुळे प्रेरणा मिळते

शॉर्ट बॉल्सविरुद्धच्या त्याच्या संघर्षाबद्दल आणि त्यावर झालेल्या टीकेबद्दल बोलताना, श्रेयस म्हणाला, बाहेर चालणारी चर्चा मला प्रेरित करते, माझ्याकडून सर्वोत्तम खेळी व्हावी यासाठी मला मदतच होते. जितके लोक माझ्याबद्दल बोलतात तितके मी ते ऐकतो आणि दबावात चांगले काम करण्यासाठी प्रेरित होतो. मी स्वतःलाच सांगतो की लोक जे बोलतात ते मला चुकीचे सिद्ध करायचे आहे.

Back to top button