कोल्हापूर : संतोष ट्रॉफीत कोल्हापूरच्या पाच खेळाडूंची निवड | पुढारी

कोल्हापूर : संतोष ट्रॉफीत कोल्हापूरच्या पाच खेळाडूंची निवड

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या वतीने (एआयएफएफ) होणार्‍या 76 व्या संतोष ट्रॉफी (हिरो नॅशनल फुटबॉल चॅम्पियनशीप) स्पर्धेतील महाराष्ट्राच्या संघात कोल्हापूरच्या पाच खेळाडूंची निवड झाली आहे. स्पर्धेच्या चौथ्या ग्रुपचे सामने कोल्हापुरातील छत्रपती शाहू स्टेडियमवर 7 ते 15 जानेवारी या कालावधीत होणार आहेत.

महाराष्ट्र राज्य फुटबॉल संघासाठीची निवड चाचणी वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या वतीने (विफा) कुपरेज मैदानावर घेण्यात आली. यात कोल्हापूर स्पोर्टस असो. (केएसए) च्या मार्गदर्शनाखाली कोल्हापुरातील सात खेळाडू सहभागी झाले होते. यापैकी 5 खेळाडूंनी आपले स्थान महाराष्ट्र संघात निश्चित केले आहे. यात पवन विजय माळी (दिलबहार तालीम मंडळ), इंद्रजित दिनकर चौगुले (शिवाजी तरुण मंडळ), यश नामदेव देवणे, ऋषीकेश गणेश मेथे-पाटील, ओंकार सुरेश पाटील (तिघे पाटाकडील तालीम मंडळ) यांचा समावेश आहे.

Back to top button