IPL2021 MIvsKKR : मुंबईचा सलग दुसरा पराभव; त्रिपाठी - अय्यर जोडीकडून यथेच्छ धुलाई - पुढारी

IPL2021 MIvsKKR : मुंबईचा सलग दुसरा पराभव; त्रिपाठी - अय्यर जोडीकडून यथेच्छ धुलाई

अबु धाबी : पुढारी ऑनलाईन

आयपीएल २०२१ मध्ये आजच्या मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स ( IPL2021 MIvsKKR ) सामन्यात कोलकात्याने मुंबईचा ७ विकेट्सनी पराभव केला. या पराभवाबरोबरच मुंबई इंडियन्सला सलग दोन पराभव सहन करावे लागले. केकेआरकडून सलामीवीर व्यंकटेश अय्यर ( ५३ ) आणि राहुल त्रिपाठी ( ७४ ) यांनी मुंबईच्या प्रत्येक गोलंदाजाची यथेच्छ धुलाई केली. मुंबईकडून बुमराहने ३ विकेट घेतल्या खऱ्या पण, यासाठी त्याला ४३ धावा खर्ची कराव्या लागल्या.

मुंबई इंडियन्सने ठेवलेल्या १५६ धावांचा पाठलाग करताना मॉर्गनच्या आक्रमक केकेआरने मुंबईची पहिल्या चेंडूपासूनच धुलाई करण्यास सुरुवात केली. शुभमन गिलने पहिल्या षटकाचा दुसराच चेंडू मैदानाबाहेर भिरकावला. येथेच केकेआर आज भलत्याच मूडमध्ये असल्याचे संकेत मिळाले.

शुभमन गिलच्या साथीला आलेला दुसरा सलामीवीर व्यंकटेश अय्यरने पहिल्या सामन्याप्रमाणे याही सामन्यात आपला दानपट्टा सुरु केला. या दोघांनी तीन षटकात ४० धावांपर्यंत मजल मारली. अखेर बुमराहने गिलचा १३ धावांवर त्रिफळा उडवून मुंबईला दिलासा दिला. मात्र हा दिलासा क्षणिक ठरला. गिलनंतर व्यंकटेश अय्यरने राहुल त्रिपाठीबरोबर मुंबईच्या गोलंदाजांचे चेंडू क्रूररित्या मैदानाबाहेर फेकण्यास सुरुवात केली.

त्रिपाठी – अय्यरकडून चौफेर फटकेबाजी

या दोघांनी दहाव्या षटकातच संघाचे शतक धावफलकावर लावले. दरम्यान, डावखुऱ्या व्यंकटेशने आपले अर्धशतक २५ चेंडूत आपले पहिले आयपीएल अर्धशतक पूर्ण केले. दुसऱ्या बाजूने त्रिपाठीही झापाट्याने आपल्या अर्धशतकाजवळ पोहचत होता. मात्र दुसऱ्या विकेटसाठी ८८ धावांची केलेली ही भागीदारी बुमराहने संपवली. त्याने व्यंकटेश अय्यरला ५३ धावांवर बाद केले.

व्यंकटेश बाद झाल्यानंतर त्रिपाठीने आपले अर्धशतक पूर्ण करत केकेआरला विजयाच्या जवळ पोहचवले. त्याने कर्णधार मॉर्गनला साथीला घेत संघाला १३ षटकात १४५ धावांपर्यंत पोहचवले. मात्र बुमराहने मॉर्गला ७ धावांवर बाद करत शेवटच्या क्षणी केकेआरला तिसरा धक्का दिला.

अखेर राहुल त्रिपाठीने १५ व्या षटकात मुंबईच्या १५५ धावांची बरोबरी केली. त्यानंतर नितीश राणाने १६ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर विजयी चौकार मारत सामना संपवला. राहुल त्रिपाठीने ४२ चेंडूत नाबाद ७४ धावांची खेळी केली. तर बुमराहने ४३ धावा देऊन ३ विकेट घेतल्या.

तत्पूर्वी, आयपीएल २०२१ मध्ये आज ( दि. २३ ) मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स ( IPL2021 MIvsKKR ) यांच्यातील सामन्यात केकेआरने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या सामन्याला मुकणारा मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा संघात परतला. त्याने सलामीला येत सावध सुरुवातीनंतर आक्रमक फटकेबाजी करण्यास सुरुवात केली.

रोहितने क्विंटन डिकॉकच्या साथीने पॉवर प्लेमध्ये मुंबईला ५६ धावांपर्यंत पोहचवले. त्यानंतर रोहित पाठोपाठ डिकॉकनेही आपला गिअर बदलला त्याने रोहितला मागे टाकत अर्धशतकाकडे वेगाने कूच केली. दरम्यान, दहाव्या षटकात सुनिल नारायणला षटकार मारण्याच्या नादात रोहित शर्मा ३० चेंडूत ३३ धावा करुन बाद झाला.

रोहितनंतर मुंबई मंदावली ( IPL2021 MIvsKKR )

रोहित बाद झाला त्यावेळी मुंबई ९.३ षटकात ७८ धावांपर्यंत पोहोचला होता. त्यानंतर सूर्यकुमार यादव मैदानावर आला. रोहित बाद झाल्यानंतर मुंबईची धावगती थोडी मंदावली. याचदरम्यान, प्रसिद्ध कृष्णाने सूर्यकुमार यादवला बाद करुन मुंबईला दुसरा धक्का दिला. यानंतर डिकॉकने आपले अर्धशतक पूर्ण करत मुंबईला १४ व्या षटकात १०० च्या पार पोहचवले.

मात्र १५ व्या षटकात प्रसिद्ध कृष्णाने डिकॉकला ५५ धावांवर बाद करत मुंबईचा सेट बॅट्समन पॅव्हेलियनमध्ये धाडला. आता अखेरच्या ५ षटकात धावगती वाढवण्याची जबाबदारी इशान किशन आणि पोलार्ड यांच्यावर आली. मात्र किशन १४ धावांची भर घालून माघारी गेला. त्याला लोकी फर्ग्युसनने बाद केले.

अखेरची ३ षटके राहिली असताना पोलार्डला साथ देण्यासाठी कृणाल पांड्या मैदानावर आला. पोलार्डने आक्रमक फटके मारण्यास सुरुवात केली. त्याने प्रसिद्ध टाकत असलेल्या १८ व्या षटकात १८ धावा वसूल केल्या. त्यानंतर कृणाल पांड्याने मोठे फटके मारण्यास सुरुवात केली.  या दोघांनी १९ व्या षटकात मुंबईला १५० धावांपर्यंत पोहचवले.

अखेरच्या षटकात पोलार्ड फटकेबाजी करत मुंबईला मोठी धावसंख्या उभारून देईल असे वाटत होते. मात्र षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर तो २१ धावा करुन धावबाद झाला. त्यानंतर कृणाल पांड्याही १२ धावा करुन बाद झाला. अखेर मुंबईचा डाव २० षटकात ६ बाद १५५ धावांवर संपुष्टात आला.

केकेआरकडून प्रसिद्ध कृष्णा आणि लोकी फर्ग्युसनने प्रत्येकी २ विकेट घेतल्या.

Back to top button