IPL 2021: दिल्ली पुन्हा अव्वलस्थानी - पुढारी

IPL 2021: दिल्ली पुन्हा अव्वलस्थानी

दुबई : पुढारी ऑनलाईन : IPL 2021 Sunrisers Hyderabad vs Delhi Capitals Live Score : कॅगिसो राबाडाच्या (37 धावांत 3 विकेटस्) भेदक गोलंदाजीनंतर शिखर धवन (42) श्रेयस अय्यर (नाबाद 47) व ऋषभ पंत (नाबाद 35) यांच्या उपयुक्‍त फलंदाजीच्या बळावर दिल्ली कॅपिटल्सने कोरोनाच्या सावटाखाली खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्यात सनरायजर्स हैदराबादवर 8 विकेटस् राखून दणदणीत विजय मिळविला. या विजयाबरोबरच दिल्लीने गुणतक्त्यात चेन्‍नईला मागे सारून पुन्हा अव्वल स्थानी झेप घेतली.

विजयासाठी 135 धावांचे लक्ष्य दिल्लीने 17.5 षटकांत 2 विकेटस्च्या मोबदल्यात 139 धावा काढून पार केले. पृथ्वी शॉ (11) व शिखर धवन या जोडीने 20 धावांची सलामी दिली. त्यानंतर धवन व श्रेयस यांनी 8 व्या षटकांत संघाचे अर्धशतक पूर्ण केले. या जोडीने शानदार फटकेबाजी करीत 47 चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. धवनला (42) राशीद खानने समदकरवी झेलबाद करीत ही जोडी फोडली. धवनने 37 चेंडूंत 6चौकार व एक षटकार खेचला.

धवन परतल्यानंतर श्रेयसला साथ देण्यासाठी कर्णधार पंत आला. या जोडीने संघाचे शतक 15 व्या षटकात फलकावर लावले. दिल्लीला शेवटच्या सहा षटकांत 39 धावांची गरज होती. शेवटी श्रेयस अय्यर (नाबाद 47) व ऋषभ पंत (नाबाद 35) यांनी तिसर्‍या विकेटस्साठी 67 धावांची अभेद्य भागीदारी करीत दिल्लीचा विजय साकारला.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणार्‍या हैदराबादची सुरुवात निराशाजनक झाली. नॉर्त्जेने केलेल्या पहिल्याच षटकात डेव्हिड वॉर्नर (0) झेल देऊन बाद झाला. राबाडाने सहाला (18) धवनकरवी झेलबाद करून हैदराबादला दुसरा धक्‍का दिला. विल्यम्सन व मनीष पांडे यांनी नवव्या षटकांत संघाचे अर्धशतक पूर्ण केले. मात्र, अक्षरच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात विल्यम्सनने (18) हेटमायरकडे झेल दिला. त्यानंतर संघाच्या धावसंख्येत एक धावेची भर घालून मनीष पांडे (17) बाद झाला.

केदार जाधवनेही (3) निराशा केली. अनुभवी खेळाडू जेसन होल्डर (10) याला अक्षर पटेलने पृथ्वीकडे झेल देण्यास भाग पाडले. त्यानंतर समदने 2 चौकार व 1 षटकाराच्या मदतीने महत्त्वपूर्ण 28 धावा काढल्या. शेवटच्या षटकात राशीद खान (2 चौकार, 1 षटकार) 22 धावांवर धावबाद झाला. संदीप शर्माही शून्यावर धावबाद झाला. हैदराबादने 20 षटकांत 9 बाद 134 धावा काढल्या. तर, भुवी 5 धावांवर नाबाद राहिला.

संक्षिप्‍त धावफलक

सनरायजर्स हैदराबाद : 20 षटकांत 9 बाद 134 धावा. (अब्दुल समद 28, राशीद खान 22, राबाडा 37 धावांत 3 विकेटस, एन्‍रिच नॉर्त्जेे व अक्षर पटेल प्रत्येकी 2 विकेटस्)

दिल्ली कॅपिटल्स : 17.5 षटकांत 2 बाद 139 धावा. (शिखर धवन 42, श्रेयस अय्यर नाबाद 47, ऋषभ पंत नाबाद 35, राशीद खान, खलिल अहमद प्रत्येकी एक विकेट.)

Back to top button