पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण चांगले असते तर कदाचित बांगलादेश संघ (BAN vs IND) ढाका कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात 231 धावा करू शकला नसता. भारतीय संघाने काही झेल सोडले, त्याचा फायदा बांगलादेशला झाला, असे वक्तव्य करत माजी क्रिकेटर सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी टीम इंडियाच्या क्षेत्ररक्षणाबाबत निराशा व्यक्त केली आहे.
सोनी स्पोर्ट्सवरील कॉमेंट्रीदरम्यान गावसकर (Sunil Gavaskar) म्हणाले की, भारतीय संघाकडे प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड आहे, ज्याच्या नावावर 200 हून अधिक झेल आहेत आणि तो या क्षेत्रातील जाणकर आहे. असे असूनही टीम इंडिया क्षेत्ररक्षणात मागे पडली आहे. ही धोक्याची घंटा आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात स्लिपमधील झेल पकडायला हवे होते. ही एक संधी असते, त्याचे सोने करायलाच हवे. तसे न झाल्यास टीम इंडियाला भविष्यात अडचणीला सामोरे जावे लागेल, त्यावर वेळीच तोडगा काढावा लागेल, असा सल्ला त्यांनी दिला.
विशेष म्हणजे विराट कोहली हा सर्वोत्तम क्षेत्ररक्षक मानला जातो पण त्याने 4 झेल सोडले. लिटन दासने याचा फायदा घेत 73 धावा केल्या. या धावांमुळे यजमानांनी 231 धावा केल्या आणि भारतासमोर 145 धावांचे लक्ष्य ठेवले. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला अडचणीचा सामना करावा लागला. सुदैवाने अश्विन आणि अय्यर संघासाठी संकटमोचक ठरले. या दोघांमध्ये मॅचविनिंग भागीदारी झाली नसती तर कदाचित बांगलादेशने सामना जिंकून मालिका बरोबरीत संपवली असती, असा टोला लगावत गावसकरांनी (Sunil Gavaskar) टीम इंडियाच्या व्यवस्थापनाचे कान टोचले.
अय्यरने नाबाद 29 आणि अश्विनने नाबाद 42 धावा करत भारतीय संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले आणि चौथ्या दिवशी तीन विकेट राखून विजय मिळवून दिला. या विजयासह भारतीय संघाने मालिका 2-0 ने जिंकली. टीम इंडियासाठी अश्विनने या मालिकेत बॅटने चांगले योगदान दिले. या मालिकेत श्रेयस अय्यर आणि चेतेश्वर पुजारा यांनी धावा वसूल केल्या.