दोन युरोपियन महासत्तांचा संघर्ष | पुढारी

दोन युरोपियन महासत्तांचा संघर्ष

दोहा, वृत्तसंस्था : युरोपचे दोन बलाढ्य संघ इंग्लंड आणि फ्रान्स हे आज फिफा विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत आमने-सामने येणार आहेत. या विश्वचषकातील आतापर्यंतचा हा सर्वात मोठा सामना ठरेल. फ्रान्स हा संघ गतविजेता आहे तर इंग्लंडला संभाव्य विजेता म्हणून गणले जाते; परंतु या दोघांपैकी एकाचे आव्हान आज संपुष्टात येणार आहे. याशिवाय ख्रिस्तियानो रोनाल्डोेचा पोर्तुगाल संघ अनपेक्षित कामगिरी करणार्‍या दक्षिण आफ्रिका खंडाचे आव्हान जिवंत ठेवणार्‍या मोरोक्कोशी भिडणार आहे.

स्पर्धेच्या राऊंड-16 मध्ये इंग्लंडने सेनेगलवर 3-0 असा सफाईदार विजय मिळवला तर फ्रान्सने पोलंडला 3-1 असे हरवले. इंग्लंडच्या विजयात हेंडरसन, हॅरी केन आणि बुकायो साका यांनी आपले योगदान दिले होते. तर फ्रान्सच्या विजयात कायलेन एम्बाप्पे आणि ऑलिव्हर गिरॉड यांनी चमक दाखवली. स्पर्धेच्या महत्त्वाच्या टप्प्यावर दोन्ही संघांतील स्टार खेळाडूंना फॉर्म मिळणे खूप महत्त्वाचे आहे.

दोन्ही संघांच्या आतापर्यंतच्या कामगिरीचा विचार करता इंग्लंडचा संघ थोडा सरस ठरतो. इंग्लंडने फ्रान्सला 17 वेळा हरवले आहे. तर 9 सामन्यांत फ्रान्सला विजय मिळाला आहे. दोन्हीमधील 5 सामने बरोबरीत सुटले आहेत.

की प्लेअर्स

ज्युड बिलिंगहॅम (इंग्लंड) : तसे तर इंग्लंडच्या संघात एकापेक्षा एक हिरे भरले आहेत; परंतु इंग्लंडच्या संघातील ज्यूड बिलिंगहॅम याचा मैदानावरील वावर म्हणजे लाईव्ह वायरच. त्याच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर इंग्लंडने अनेक विजय मिळवले आहेत.

कायलेन एम्बाप्पे (फ्रान्स) : या विश्वचषकात आतापर्यंत एम्बाप्पेची कामगिरी अतिशय चांगली झाली आहे. स्पर्धेत त्याने 5 गोल नोंदवले आहेत. त्याचा हाच फॉर्म कायम राहिला तर इंग्लंडसाठी वाट मुश्कील असेल.

निकालाचा अंदाज : हा एक हाय व्होल्टेज सामना असल्याने तो पूर्ण वेळेत आणि जादा वेळेत 1-1 असा बरोबरीत राहील. त्यानंतर हा सामना पेनल्टी शूटआऊटवर फ्रान्स जिंकेल. अर्थात, हा अंदाज असल्याने प्रत्यक्षात मैदानावर काय घडेल हे आज रात्री कळेल.

Back to top button