फिफा वर्ल्डकप 2022 : फ्रान्स, इंग्लंडचे अपेक्षित विजय | पुढारी

फिफा वर्ल्डकप 2022 : फ्रान्स, इंग्लंडचे अपेक्षित विजय

कायलियन एम्बाप्पेच्या (फिफा वर्ल्डकप 2022) दोन गोलच्या जोरावर गतविजेत्या फ्रान्सने पोलंडचा 3-1 गोलने पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. गेल्या 16 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 14 गोल आणि या विश्वचषक स्पर्धेत एकूण 5 गोल नोंदवत 23 वर्षीय एम्बाप्पेने विश्वचषक स्पर्धेत आपली जादू कायम ठेवली आणि गोल्डन बूट मिळवण्याच्या दिशेने आपली दावेदारी कायम केली. फ्रान्सचा स्ट्रायकर ओलिव्हर गिरॉर्डने या सामन्यात पहिला गोल नोंदवला आणि थिअरी हेंरीच्या नावावर असलेला फ्रान्ससाठी सर्वाधिक 52 गोल नोंदवण्याचा विक्रम मोडीत काढला.

गिरॉर्ड गेली अकरा वर्षे आंतरराष्ट्रीय स्तरावर फ्रान्सचे प्रतिनिधित्व करीत आहे, पण बर्‍याच वेळेला थिअरी हेंरी, करीम बेंझेमा, अँटिनोओ ग्रीस्मन यांच्यासारखे दर्जेदार स्ट्रायकर असल्यामुळे त्याला स्टार्टिंग इलेव्हनमध्ये एकसारखी संधी मिळत नव्हती. एकतर बदली खेळाडू म्हणून किंवा महत्त्वाच्या खेळाडूंच्या अनुपस्थितीत प्रशिक्षक त्याला मैदानामध्ये उतरत असत. तरीसुद्धा ज्या ज्या वेळी त्याला संधी मिळाली त्या त्यावेळी त्या संधीचे सोने करत त्याने फ्रान्ससाठी आपला सर्वोत्तम खेळ केला. ही स्पर्धा सुरू होण्याअगोदर फ्रान्सचे सहा महत्त्वाचे खेळाडू इंज्युरीमुळे स्पर्धेबाहेर गेले. तरीसुद्धा या विश्वचषक स्पर्धेत फ्रान्सचा संघ अतिशय तगडा वाटत आहे.

4-2-3-1 या फॉर्मेशनने मैदानात उतरलेल्या डीडीयर देशचाम्प यांच्या संघाने ग्रीसमन, गिरॉर्ड, आणि एम्बाप्पे या त्रिकुटाच्या जोरावर पोलंडबरोबर चांगली सुरुवात केली. पोलंडने पहिल्यापासून एम्बाप्पेला मार्क केले होते त्यामुळे त्याच्याकडून जास्त आक्रमण होत नव्हते. एम्बाप्पेच्या बाजूने म्हणजेच डाव्या फ्लॅकमधून आक्रमणे रचण्याचा त्यांची पहिल्या हाफ मधील रणनीती यशस्वी झाली नाही. पहिला हाफ संपण्यास काही मिनिटांचा अवधी असताना एम्बाप्पेला मार्क केल्यामुळे त्या ठिकाणी पोलंड बचावपटूंची जी जागा रिकामी राहत होती त्या जागेचा उपयोग गिरॉर्डने करून घेतला.

एम्बाप्पेच्या पासवर त्याने उत्कृष्ट गोल नोंदवत फ्रान्सला आघाडी मिळवून दिली. दुसर्‍या हाफमध्ये फ्रान्सने रणनीतीत थोडेसे बदल केले आणि बचाव अधिक मजबूत करत राईट विंगर खेळणार्‍या डेंबेलेकडून उजव्या फ्लॅकमधून आक्रमण सुरू केले. उजव्या फ्लॅकमध्ये एम्बाप्पेला मार्क केलेले असल्यामुळे उजव्या फ्लॅकमध्ये डेंबेले फ्री राहत होता. त्याचा फायदा फ्रान्सने करून घेतला. 74 व्या मिनिटाला झालेल्या काऊंटर अटॅकवर पोलंडचा डिफेन्स भेदत एम्बाप्पेने उत्कृष्ट गोल नोंदवला.

सामना संपत असताना उजव्या बाजूला सरकलेल्या बचावफळीचा फायदा पुन्हा एकदा एम्बाप्पेने करून घेतला आणि आणखी एक गोल नोंदवला. दुसर्‍या हाफमध्ये बदललेल्या रणनीतीचा फायदा फ्रान्सला झाला. इंज्युरी टाईममध्ये पोलंडला पेनल्टी किक मिळाली. लेवेंडोस्कीने मारलेली ही किक फ्रान्सच्या गोलकीपर लॉरिसने अडवली, पण गोलकीपर ऑफेन्स झाल्यामुळे पोलंडला रिकिक मिळाली. त्यावर लेवेंडोस्कीने गोल नोंदवत आघाडी कमी केली. त्याच्या वयाचा विचार करता कदाचित लेवेंडोस्कीची विश्वचषक स्पर्धेतील ही शेवटची गोल ठरेल.

राऊंड ऑफ 16च्या दुसर्‍या सामन्यात इंग्लंडने (फिफा वर्ल्डकप 2022) आफ्रिकन चॅम्पियन सेनेगलचा 3-0 गोलने पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पहिल्या हाफची सुरुवात इंग्लंडकडून अतिशय खराब झाली. सुरुवातीलाच सेनेगलने अतिशय चांगला खेळ करत इंग्लंडला दबावाखाली आणले होते. इंग्लिश गोलकीपर पीकफोर्डने दोन उत्कृष्ट बचाव केले नसते तर मध्यंतरापर्यंत सेनेगल 2-0 गोलने आघाडीवर असते.

पहिल्या हाफमध्ये इंग्लंडला दोन संधी मिळाले आणि त्या संधीचे गोलमध्ये रूपांतर केल्यामुळे मध्यंतराला इंग्लंडकडे दोन गोलची आघाडी होती. यातील एक गोल कर्णधार हॅरी केनने केला आणि आपला गोलचा दुष्काळ संपवला. दुसर्‍या हाफच्या 57 व्या मिनिटाला युवा खेळाडू साकाने गोल करत ही मॅच इंग्लंड च्या नावावर केली. या स्पर्धेत इंग्लंडने एकूण 12 गोल केलेले आहेत. हे बारा गोल वेगवेगळ्या आठ खेळाडूंनी नोंदवलेले आहेत. यावरून इंग्लंडची गोल करण्याची क्षमता लक्षात येते. सेनेगलला या सामन्यात त्यांच्या काही महत्त्वाच्या खेळाडूंची अनुपस्थिती जाणवली.

सादियो माने जखमी असल्यामुळे स्पर्धेत खेळू शकला नाही. याचा मोठा परिणाम सेनेगलच्या आक्रमक फळीवर झालेला दिसून आला. मागील सामन्यात रेड कार्ड मिळाल्यामुळे अ‍ॅड्रेस गीएला इंग्लंड बरोबरच्या सामन्यात खेळता आले नाही. उपांत्यपूर्व फेरीत आता इंग्लंडचा सामना बलाढ्य फ्रान्स बरोबर होईल. इंग्लंडच्या बचावफळीला एम्बाप्पे आणि त्याच्या सहकार्‍यांना थोपवण्याचे आव्हान असेल. दोन युवा आणि प्रतिभावान खेळाडूंचा भरणा असलेल्या संघादरम्यान अकरा तारखेला होणारा हा सामना स्पर्धेतील सर्वात रोमांचक सामना असेल.

Back to top button