Pakistan vs England 1st Test : पाकिस्तानच्या तिघांची शतके; ७ बाद ४९९ धावा | पुढारी

Pakistan vs England 1st Test : पाकिस्तानच्या तिघांची शतके; ७ बाद ४९९ धावा

रावळपिंडी; वृत्तसंस्था : इंग्लंडचा संघ तब्बल 17 वर्षांनी पाकिस्तानमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. मालिकेतील पहिली कसोटी रावळपिंडी येथे सुरू आहे. कसोटीच्या पहिल्याच दिवशी पाहुण्या इंग्लंडने पाकिस्तानच्या गोलंदाजांची पिसे काढली होती. पहिल्याच दिवशी 4 शतकी खेळींसह 500 हून जास्त धावा करण्याचा विक्रम इंग्रजांनी केला होता. (Pakistan vs England 1st Test)

मात्र, पहिल्या आणि दुसर्‍या दिवशी जी गत पाकिस्तानी गोलंदाजांची झाली तीच गत तिसर्‍या दिवशी इंग्लंडच्या गोलंदाजांचीदेखील झाली. पाकिस्तानच्या फलंदाजांनी तीन शतके ठोकली आहेत. सामन्याच्या तिसर्‍याच दिवशी दोन्ही संघांनी मिळून तब्बल 7 शतके ठोकली. (Pakistan vs England 1st Test)

सामन्याच्या दुसर्‍या दिवशी इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात 657 धावा केल्यानंतर पाकिस्ताननेदेखील आपल्या पहिल्या डावाची दमदार सुरुवात केली. पाकिस्तानचा सलामीवीर अब्दुल्ला शफीफ आणि इमाम उल हक यांनी शतकी खेळी केली. तिसर्‍या दिवशीही पाकिस्तानच्या फलंदाजांनी विकेटवर ठिय्या मांडला होता. मात्र, जॅक लिचने इमामला 121 धावांवर बाद करत 225 धावांची सलामी भागीदारी तोडली.

यानंतर शफीफदेखील 114 धावा करून बाद झाला. कर्णधार बाबर आझमनेदेखील शतक ठोकत संघाला 400 धावांच्या पार पोहोचवले. तिसर्‍या दिवसाचा खेळ संपला, त्यावेळी पाकिस्तानच्या पहिल्या डावात 7 बाद 499 धावा झाल्या होत्या, तरीदेखील पाकिस्तान अजून 158 धावांनी पिछाडीवर आहे.


अधिक वाचा :

Back to top button