IND vs BAN : टीम इंडियाचे ‘मिशन वर्ल्डकप 2023’ | पुढारी

IND vs BAN : टीम इंडियाचे ‘मिशन वर्ल्डकप 2023’

दोहा, वृत्तसंस्था : भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना रविवारी (दि.4) मीरपूर येथे खेळला जाणार आहे. या सामन्यापासून टीम इंडिया पुढील वर्षी भारतात होणार्‍या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी मिशन वर्ल्डकप 2023 ला सुरुवात करणार आहे. विश्वचषकासाठी संभाव्य संघ तयार करण्याचे काम या मालिकेपासून टीम इंडिया करणार आहे. न्यूझीलंड दौर्‍यात सहभागी नसलेले कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहली बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत पुनरागमन करत आहे. बांगलादेशने या मालिकेसाठी तमीम इक्बालकडे नेतृत्व दिले आहे; परंतु पहिल्या सामन्यापूर्वी यजमान संघाला धक्का बसला असून, त्यांचा वेगवान गोलंदाज तस्कीन अहमद पहिल्या सामन्याला मुकला आहे.

कर्णधार रोहित शर्मा आणि शिखर धवन बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात सलामी करताना दिसतील. रोहित शर्मा आणि शिखर धवन हे दोघेही स्फोटक फलंदाजीत माहीर आहेत आणि ते कधीही सामना फिरवू शकतात. मधल्या क्रमांकामध्ये स्टार फलंदाज विराट कोहली तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरणार आहे. या एकदिवसीय मालिकेत मिस्टर 360 डिग्री फलंदाज सूर्यकुमार यादवला विश्रांती देण्यात आली आहे.

अशा परिस्थितीत स्फोटक फलंदाज श्रेयस अय्यर बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरणार आहे. त्याचबरोबर उपकर्णधार केएल राहुलला पाचव्या क्रमांकावर संधी दिली जाईल. यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरेल. ऋषभ पंत यष्टिरक्षकाची भूमिका साकारणार आहे. सातव्या क्रमांकावर अष्टपैलू अक्षर पटेलला संधी दिली जाणार आहे, तर ऑफस्पिनर वॉशिंग्टन सुंदरचा प्लेईंग इलेव्हनमध्ये एकमेव स्पेशलिस्ट फिरकी गोलंदाज म्हणून समावेश केला जाईल. मोहम्मद सिराज, उमरान मलिक आणि दीपक चहर यांना वेगवान गोलंदाज म्हणून टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळेल.

दुसरीकडे बांगलादेशही या मालिकेत भारताला मजबूत टक्कर देण्याच्या तयारीत असेल. त्यांचा कर्णधार शाकिब अल हसनने टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर राजीनामा दिला असला तरी संघात तो असणार आहे. बांगलादेशच्या संघाचे नेतृत्व तमीम इक्बाल या अनुभवी सलामीवीराकडे देण्यात आले आहे.

शमी दौर्‍यातून बाहेर; उमरान मलिकला संधी (IND vs BAN)

टीम इंडियाला रविवारपासून बांगलादेशविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे. याआधी संघाला मोठा धक्का बसला. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी खांद्याच्या दुखापतीमुळे बांगलादेशविरुद्धच्या संपूर्ण एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला आहे. बीसीसीआयने आता याला दुजोरा दिला आहे. शमीच्या जागी स्पीड गन उमरान मलिकचा एकदिवसीय मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आला आहे.

Back to top button