पहिल्या सामन्यावर संकटाचे ढग; भारत-न्यूझीलंड आजचा टी-20 पावसामुळे रद्द होण्याची शक्यता | पुढारी

पहिल्या सामन्यावर संकटाचे ढग; भारत-न्यूझीलंड आजचा टी-20 पावसामुळे रद्द होण्याची शक्यता

वेलिंग्टन; वृत्तसंस्था :  भारत आणि न्यूझीलंड संघ टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर पुन्हा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत. ऑस्ट्रेलियात उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर दोन्ही संघ नव्याने सुरुवात करतील. दोन्ही संघांमध्ये आज (18 नोव्हेंबर) पासून (शुक्रवार) तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात होत आहे, पण या सामन्यावर संकटकाचे ढग दाटले असून हवामान खात्याने येथे पावसाची शक्यता वर्तवली आहे.

न्यूझीलंड दौर्‍यावर अष्टपैलू हार्दिक पंड्या टीम इंडियाचे नेतृत्व करत असून ऋषभ पंत उपकर्णधार आहे. या न्यूझीलंड दौर्‍यावर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांसारख्या अनेक वरिष्ठ खेळाडूंना पाठवण्यात आले नाही. त्यांना विश्रांती देण्यात आली आहे. अशा स्थितीत युवा खेळाडूंना या दौर्‍यात स्वत:ला सिद्ध करण्याची संधी आहे, पण चाहत्यांसाठी वेलिंग्टनमधून ही निराशाजनक बातमी समोर आली आहे.

न्यूझीलंडच्या हवामान अंदाजानुसार, शुक्रवारी वेलिंग्टनमध्ये पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. अहवालानुसार दुपारी आणि संध्याकाळी पाऊस पडेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. ढगाळ वातावरण राहून जोरदार वार्‍यासह तापमान 14 अंशांपर्यंत पोहोचू शकते, अशीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सामना झाल्यास येथील खेळपट्टी फलंदाजांसाठी उपयुक्त ठरू शकते. टीम इंडिया चौथ्यांदा स्काय स्टेडियमवर खेळणार आहे. यातील दोन सामन्यांत भारतीय संघाचा पराभव झाला असून एक सुपर ओव्हरमध्ये जिंकला आहे.

निर्भीडपणे खेळा : व्ही. व्ही. एस. लक्ष्मण

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वेंलिग्टन येथे शुक्रवारी पहिला टी-20 सामना होईल. यापूर्वी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी टीम इंडियाला यशाचा मंत्र दिला आहे. ते म्हणाले की, टी-20 फॉरमॅटमध्ये निर्भीडपणे बॅटिंग करावी लागते. त्याचबरोबर परिस्थितीचाही विचार करून तुम्हाला निर्णय घ्यावा लागतो. संघाच्या गरजेनुसार तुम्हाला खेळ करावा लागतो. या फॉरमॅटमध्ये क्रिकेटपटूंचा विचार स्पष्ट असावा लागतो. त्याला स्वत:ला आपली कामगिरी तत्काळ दाखवावी लागते. हा विचार करून खेळाडू मैदानात उतरले तर विजय निश्चित असतो.

संघ यातून निवडणार

न्यूझीलंड : केन विल्यम्सन (कर्णधार), फिन अ‍ॅलन, मायकेल ब—ेसवेल, डेव्हॉन कॉनवे (विकेटकीपर), लॉकी फर्ग्युसन, डॅरिल मिशेल, अ‍ॅडम मिल्ने, जिमी नीशाम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, ईश सोधी, टीम साऊदी, ब्लेअर टिकनर.
भारत : हार्दिक पंड्या (कर्णधार), शुभमन गिल, ईशान किशन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (उपकर्णधार आणि विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, यजुवेंद्र चहल, कुलदीप सिंग, अरविंद यादव, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.

सामन्याची वेळ
दुपारी 12 वाजता

थेट प्रक्षेपण : डी.डी. स्पोर्टस्
लाईव्ह स्ट्रीमिंग : अ‍ॅमेझॉन प्राईम

Back to top button