इंडियन प्रीमिअर लीग : नव्या संघांची घोषणा १७ ऑक्टोबरला? | पुढारी

इंडियन प्रीमिअर लीग : नव्या संघांची घोषणा १७ ऑक्टोबरला?

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : इंडियन प्रीमिअर लीग च्या पुढील पर्वात दोन नव्या संघांचा समावेश होणार असून, त्यासाठीची अर्ज करण्याची मुदत संपली आहे. आता हे दोन नवे संघ कोणते असतील याची उत्सुकता लागली आहे आणि 17 ऑक्टोबरला बीसीसीआय त्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. एका संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार आयपीएल 2021च्या अंतिम सामन्यानंतर दुबईत याची घोषणा होण्याची शक्यता आले. मस्कत किंवा दुबईत दोन नव्या संघांसाठी लिलाव प्रक्रिया पार पाडली जाईल.

या वृत्तात म्हटले आहे की, तीन टप्प्यांत दोन संघांसाठीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. 21 सप्टेंबरला नवीन संघांसाठी आलेल्या अर्जांची छाननी केली जाईल. 5 ऑक्टोबरपर्यंत कागदपत्रे सादर केली जातील आणि 17 ऑक्टोबरला ‘ऑक्शन’ होईल. दोन नवीन संघांच्या समावेशानंतर प्रत्येक संघाच्या वाट्याला 14 किंवा 18 सामने येतील; पण  इंडियन प्रीमिअर लीग चा कालावधी लक्षात घेता दहा संघांची दोन गटांत विभागणी करून सामने खेळवण्यात येतील.

नव्या संघासाठी बीसीसीआयने ज्या कंपनीचे ‘टर्नओव्हर’ 3000 कोटी आहे, त्यांनाच बोली लावण्याची अट ठेवली आहे. तसेच, नव्या संघाची प्रत्येकी किंमत ही 2 ते 2.5 हजार कोटी असेल.

दोन नव्या संघांसाठी अहमदाबाद, लखनौ, इंदौर, कटक, गुवाहाटी आणि धर्मशाला या शहरांमध्ये चुरस असेल आणि सर्वाधिक बोली लावणारा जिंकेल. दोन नवीन संघांच्या समावेशामुळे पुन्हा खेळाडूंचा लिलाव होईल आणि सूत्रांच्या माहितीनुसार आता खेळत असलेल्या 8 फ्रँचायझींना प्रत्येकी दोन खेळाडू कायम राखता येतील. तर, दोन खेळाडू आरटीएमनुसार संघात राखता येतील. नोव्हेंबरमध्ये याबाबतची अधिकृत घोषणा केली जाईल आणि जानेवारी 2022 मध्ये खेळाडूंचा महालिलाव होईल.

Back to top button