वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा सर्व फॉरमॅटमधून निवृत्त

कोलंबो ; वृत्तसंस्था : ‘यॉर्कर किंग’ म्हणून ओळखला जाणारा श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मलिंगाने मंगळवारी सोशल मीडियावर आपल्या निवृत्तीची घोषणा केली.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून त्याने आधीच निवृत्ती घेतली होती. ‘मी आता क्रिकेटच्या सगळ्या प्रकारांमधून संन्यास घेत आहे. माझ्या या प्रवासात ज्यांनी मला साथ दिली त्यांचे आभार. आता मी युवा क्रिकेटपटूंसोबत आपला अनुभव शेयर करणार आहे. माझ्या बुटांना 100 टक्के विश्रांती देण्याचा निर्णय मी घेतला आहे,’ असे मलिंगा म्हणाला.

श्रीलंकेसोबतच लसिथ मलिंगाने आयपीएलमध्ये मुंबईला 5 वेळा चॅम्पियन बनवण्यात मोलाची भूमिका निभावली. मलिंगा पहिल्या मोसमापासून मुंबई इंडियन्ससोबतच खेळला. आयपीएल इतिहासात सर्वाधिक विकेटस् घेण्याचा विक्रमही मलिंगाच्या नावावर आहे.

मलिंगा टी-20 क्रिकेटमधल्या सगळ्यात यशस्वी गोलंदाजांपैकी एक आहे. मलिंगाने 295 टी-20 सामन्यांत 390 विकेटस् घेतल्या आहेत. मलिंगाची सरासरी फक्त 7.07 होती. टी-20 मध्ये त्याने 5 वेळा 5 विकेटस् आणि 10 वेळा 4 विकेटस् घेतल्या होत्या.

आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम मलिंगाच्या नावावर आहे. मलिंगाने आयपीएलमध्ये 170 विकेट्स घेतल्या आहेत.

वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा गेल्या वर्षापासूनच टी-20 क्रिकेटपासून लांब आहे. आयपीएल 2020 मधूनही त्याने आपले नाव मागे घेतले होते. मुंबई इंडियन्सलाही त्याने याबाबतची माहिती दिली होती.

Back to top button