T20 World Cup : विराट कोहली, सूर्यकुमार मालिकावीरच्या शर्यतीत | पुढारी

T20 World Cup : विराट कोहली, सूर्यकुमार मालिकावीरच्या शर्यतीत

मेलबर्न, वृत्तसंस्था : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 वर्ल्डकपमधील (T20 World Cup) मालिकावीर पुरस्कारासाठी आयसीसीने 9 खेळाडूंची नावे शॉर्टलिस्ट केली आहेत. शुक्रवारी आयसीसीने ही 9 खेळाडूंची यादी जाहीर केली. या यादीत भारताच्या विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांची नावे देखील आहेत. दोघांनीही यंदाच्या टी- 20 वर्ल्डकपमध्ये (T20 World Cup) दमदार फलंदाजी करत धावांचा पाऊस पाडला होता. रविवारी पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील अंतिम सामन्यानंतर या पुरस्काराची घोषणा केली जाणार आहे.

मालिकावीरच्या पुरस्कारासाठी इंग्लंड संघातून 3, पाकिस्तान संघातून 2 तर श्रीलंका आणि झिम्बाब्वे संघातून प्रत्येकी एका खेळाडूची नावे शॉर्टलिस्ट करण्यात आली आहेत. याचबरोबर भारताच्या दोन नावांचा देखील समावेश आहे. विराट कोहलीने यंदाच्या टी-20 वर्ल्डकपमध्ये धडाकेबाज फलंदाजी करत 296 धावा केल्या आहेत. त्याने या धावा 98.66 च्या सरासरीने ठोकल्या आहेत. तर त्याचा स्ट्राईक रेट हा 136.40 इतका होता. तो सध्या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणार्‍यांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. विराट कोहलीने या टी-20 वर्ल्डकपमध्ये सहा सामन्यांत 4 अर्धशतकी खेळी केली आहे. यात पाकिस्तानविरुद्धची 82 धावांची धुवाँधार खेळी सर्वोत्तम होती.

भारताच्या सूर्यकुमार यादवने देखील आपल्या चौफेर फटकेबाजीने क्रिकेट रसिकांची मने जिंकली. त्याने स्पर्धेत सहा सामन्यांत 239 धावा केल्या आहेत. त्याचा स्पर्धेतील स्ट्राईक रेट हा 189.68 इतका दमदार आहे. याचबरोबर त्याने स्पर्धेत तीन अर्धशतकी खेळीदेखील केल्या. त्याने झिम्बाब्वे, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँडविरुद्ध अर्धशतक खेळी केली. सूर्यकुमार यादवने टी-20 आयसीसी रँकिंगमध्ये देखील आपला दबदबा कायम ठेवत अव्वल स्थान पटकावले.

Back to top button