IND vs ENG: इंग्लंडचा अनोखा विक्रम, ‘ॲडलेड ओव्हल’वर टॉस जिंकून सामना घातला खिशात! | पुढारी

IND vs ENG: इंग्लंडचा अनोखा विक्रम, ‘ॲडलेड ओव्हल’वर टॉस जिंकून सामना घातला खिशात!

पुढारी ऑनलाईन डेस्क : टी-२० विश्वचषकातील उपांत्य सामन्यात (IND vs ENG) नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत ६ गडी गमावून १६९धावा केल्या. विराट कोहलीने ४० चेंडूत ५० धावा आणि हार्दिक पांड्याने ३३ चेंडूत ६३ धावा करत इंग्लंडला विजयासाठी १६९ धावांचे आव्हान दिले होते. प्रत्युत्तरात इंग्लंडने १६षटकांत बिनबाद १७० धावा करून सामना जिंकला.

ॲडलेडमध्ये झालेल्या टी-२० वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये इंग्लंडने भारताचा १० गडी राखून पराभव केला. या पराभवामुळे टीम इंडिया पुन्हा एकदा उपांत्य फेरीतून बाहेर पडली. आता १३ नोव्हेंबरला जेतेपदाच्या लढतीत इंग्लंडचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. हा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर होणार आहे. (IND vs ENG)

ॲडलेडमध्ये इंग्लंडने इतिहास रचला

एकही विकेट न गमावता आंतरराष्ट्रीय टी-२० मधील हा तिसरा सर्वात मोठा विजय आहे. त्याचबरोबर एकही विकेट न गमावता इंग्लंडचा हा सर्वात मोठा विजय आहे. एकही विकेट न गमावता सर्वात मोठ्या विजयाचा विक्रम पाकिस्तानच्या नावावर आहे. त्यांनी यावर्षी कराचीमध्ये इंग्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यात बिनबाद २०३ धावांचे आव्हान पार केले होते. दुसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंडचा संघ आहे. २०१६ मध्ये हॅमिल्टन येथे झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्यांनी एकही विकेट न गमावता १७१ धावा करत सामन्यात विजय मिळवला होता. इंग्लंडचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे.

ॲडलेडमध्ये नाणेफेक जिंकून सामना जिंकणारा पहिला कर्णधार

२०११ मध्ये इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरूध्दच्या सामन्यात १५८ धावांचे आव्हान पार करून सामन्यात विजय मिळवला होता. ॲडलेडमध्ये या सामन्यापूर्वी ११ सामने खेळले गेले होते. या सामन्यात संघाने नाणेफेक जिंकून सामन्यात विजय मिळवला नव्हता. मात्र, इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलरने आजचा सामना जिंकत आगळा-वेगळा विक्रम आपल्या नावावर केला आहे. अॅडलेडमध्ये नाणेफेक जिंकून सामना जिंकणारा तो पहिला कर्णधार बनला आहे.

हेही वाचा;

Back to top button