T20 World Cup : नाट्यमय रविवारी भारताचा उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश | पुढारी

T20 World Cup : नाट्यमय रविवारी भारताचा उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश

   थेट ऑस्ट्रेलियातून

  • निमिष पाटगावकर

 विश्वचषकातील (T20 World Cup 2022) साखळी सामन्यांच्या शेवटच्या दिवसाची नाट्यमय सुरुवात झाली. द. आफ्रिकेने आपला चोकर्सचा शिक्का सेफ डिपॉझिटमध्ये ठेवल्यासारखा जपत आहेत. भारतासारख्या बलाढ्य संघाला हरवल्यावर नेदरलँडसारख्या अननुभवी संघाकडून हरायची किमया फक्त तेच करू शकतात. द. आफ्रिका चोक झाले, पण त्यांचा श्वास कोंडायला नेदरलँड जे खेळलेत त्याला तोड नाही. या विश्वचषकाने नेदरलँड, आयर्लंडसारख्या संघांनी आपली प्रगती दाखवून दिली आहे.

द. आफ्रिका स्पर्धेतून सकाळीच बाहेर पडल्याने भारताच्या दोन्ही बाजूच्या शेजार्‍यांसाठी हा साखळी सामना म्हणजे उपउपांत्य फेरीचा सामना होता. बांगलादेशने जीव तोडून सामन्याला सुरुवात केली, पण त्यांना तो वेग राखता आला नाही. द. आफ्रिका बाद झाल्याने भारताचा उपांत्य फेरीत आपोआप प्रवेश झाला होता. एकच शक्यता होती ती म्हणजे झिम्बाब्वेविरुद्ध हरलो असतो तर अ‍ॅडलेडच्याऐवजी सिडनीला उपांत्य सामना खेळावे लागला असता. सुदैवाने हा शेवटचा सामना आपण अपेक्षेप्रमाणे निखळ जिंकला आणि इंग्लंडविरुद्ध खेळायला अ‍ॅडलेडचे तिकीट बुक केले.

भारताचा उपांत्य फेरीचा प्रवेश सकाळीच निश्चित झाला असला तरी सामना जिंकणे गरजेचे होते. कारण न्यूझीलंड हा स्पर्धेतील सर्वोत्तम संघ आहे तेव्हा त्यांच्याविरुद्ध उपांत्य सामना खेळण्यापेक्षा इंग्लंड बरे. कुठचेही मानसिक दडपण नसताना भारतीय खेळाडू या सामन्यात मुक्तपणे खेळतील अशीच अपेक्षा होती. ऋषभ पंतला या दौर्‍यावर एकदा बदली यष्टिरक्षकाचे काम सोडले तर सामन्यात मैदानात उतरायची संधी मिळाली नव्हती. या सामन्यात आपण दिली. खरे तर हे आधीच व्हायला पाहिजे होते.

नाणेफेक जिंकून मेलबर्नच्या फलंदाजीला पोषक वातावरणात आपण फलंदाजीचा सराव करणार हे नक्की होते. साखळी स्पर्धेतील शेवटच्या सामन्यातही आपल्याला उत्तम सलामी मिळाली नाही. या स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध 7, नेदरलँडविरुद्ध 11, द. आफ्रिकेविरुद्ध 23, बांगलादेशविरुद्ध 11 तर या सामन्यात रोहित शर्मा-राहुल जोडीने 27 धावा केल्या. भारताच्या स्पर्धेतील पुढच्या वाटचालीच्या द़ृष्टीने उत्तम सलामी मिळणे गरजेचे आहे. एकही सामन्यात आपली सलामी पॉवर प्लेचा फायदा सोडा, पण खेळून काढण्यात यशस्वी झाली नाही. सुरुवातीला राहुल अडखळत होता आणि टीकेचा धनी होत होता, तर आता रोहित शर्माचा पूलचा फटका प्रेक्षकात जायच्या ऐवजी डीप स्क्वेअरलेग, डीप मिडविकेटच्या हातात जात आहे.

ऑस्ट्रेलियातील प्रत्येक मैदान वेगळे आहे हे या देशात इतक्यांदा खेळल्यावर आपल्या खेळाडूंना सांगायची गरज नाही. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडची एका बाजूची मिडविकेटची सीमारेषा तब्बल 84 मीटर आहे तर समोरच्या आणि दुसर्‍या बाजूच्या मिडविकेटची सीमारेषा 75 मीटर आहे. स्क्वेअरच्या सीमारेषा 75 मीटर आहेत. अ‍ॅडलेडला हीच अंतरे स्क्वेअरला फक्त 62-64 मीटर आहेत तर समोर 80 मीटर आहेत. रोहित शर्माचे आखूड टप्प्याच्या चेंडूवर तुटून पडायला हात शिवशिवतात, पण त्यामुळे तो फटका आधी खेळत आहे. या सामन्यातही मुझरबानीचा चेंडू खेळताना तो शफल होत ऑफ स्टम्पकडे सरकला आणि जेव्हा फटका खेळला तेव्हा त्याला अपेक्षित ताकद आणि उंची देता आली नाही आणि मेलबर्नच्या लांबच्या सीमारेषेची त्याची निवड चुकली.

के. एल. राहुलने लागोपाठ दुसरे अर्धशतक झळकावत राहुल द्रविडने त्याच्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवला. कोहली आणि राहुलची भागीदारी चालू असताना धावांचा वेग वाढवायचे लक्ष्य स्पष्ट होते. या मैदानावर 180 धावा सहज अपेक्षित होत्या, पण त्या 200 पर्यंत कशा पोहोचवता येतील हे त्यांच्या फटक्यांच्या निवडीतून दिसत होते. कोहली एका सामान्य आपटीबार चेंडूवर आपली विकेट गमावून बसला तर राहुल गेल्या सामन्यासारखाच पन्नास झाल्यावर लगेच बाद झाला.

यानंतर मैदानात चालू झाला तो ‘द सूर्यकुमार यादव शो!’ मेलबर्नच्या आकाशातला सूर्य मावळल्यावर या सूर्याच्या बॅटची किरणे मैदानाच्या कानाकोपर्‍यात पसरायला लागली. बॅटमधून निघालेल्या सोनसळी किरणांनी धावांचा अभिषेक घातला. सूर्यकुमार यादव फलंदाजीला उतरतानाचा इथल्या 82,507 प्रेक्षकांचा जल्लोष सूर्याची वाढती लोकप्रियता दाखवत होता. (T20 World Cup 2022)

भारत – झिम्बाब्वे सामन्याला एमसीजी खचाखच भरलेले पाहून क्रिकेट ऑस्ट्रेलिया, आयसीसी सगळेच सुखावले असतील, पण या गर्दीला सुखावले ते सूर्याने त्याच्या कलात्मक फटकेबाजीने. चेंडू कसाही आणि कुठेही टाका तो आपल्या मर्जीने आपल्याला हवे ते फटके खेळताना त्याची गोलंदाजांवरची हुकूमत दिसत होती. झिम्बाब्वेची फलंदाजी 187 चे आव्हान पेलणारी नव्हतीच तेव्हा भारताचा विजय नक्की होता.

आपल्या गोलंदाजांनी हात साफ करून घेतले. अश्विन टी-20 चा खेळाडू आहे का नाही, वाद करता करता तो या सामन्यात सर्वोत्तम गोलंदाज ठरला. झिम्बाब्वेच्या रझा आणि रायन बर्लने पन्नासची भागीदारी करताना थोडा प्रतिकार दाखवला, पण सामन्याच्या कुठच्याही क्षणी झिम्बाब्वे वरचढ व्हायची चिन्हे नव्हती. आपल्याला हवा होता तसा निखळ विजय आपण मिळवला आणि जरी आता नेट रनरेटला महत्त्व नाही तरी या मोठ्या विजयाने पाकिस्तानला मागे टाकत सर्वार्थाने आपल्या गटात अव्वल स्थान मिळवले. भारताची लढत आता 10 तारखेला असल्याने आता 3 दिवस ताजेतवाने व्हायला आहेत. तेव्हा नव्या दमाने इंग्लंडशी सामना करायला आपण तयार असू.

Back to top button