लोकेश राहुलच्या फॉर्मची चिंता नाही : राहुल द्रविड | पुढारी

लोकेश राहुलच्या फॉर्मची चिंता नाही : राहुल द्रविड

अ‍ॅडलेड, वृत्तसंस्था : भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज के. एल. राहुल याला टी-20 वर्ल्डकप सुरू झाल्यापासून पहिल्या तीन सामन्यांत मिळून केवळ 22 धावाच करता आल्या आहेत. बांगला देश विरुद्ध होणार्‍या सामन्यात लोकेश राहुलला संघाबाहेर करावे, अशी मागणी भारतीय चाहते करताना दिसत आहेत. भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी के. एल. राहुलची पाठराखण केली आहे. के. एल. राहुलचा फॉर्म हा आमच्या चिंतेचा विषय अजिबातच नाही, असे द्रविडने स्पष्टपणे सांगितले.

के. एल. राहुल हा एक अतिशय उत्कृष्ट खेळाडू आहे. त्याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीने ही गोष्ट वेळोवेळी सिद्ध केली आहे. तो अतिशय उत्तम फलंदाजी करतो हे आपण सार्‍यांनी पाहिलेले आहे. टी-20 क्रिकेटमध्ये फलंदाजांचा फॉर्म जाणे ही गोष्ट बरेचदा घडताना दिसते. ऑस्ट्रेलियातील ही स्पर्धा आव्हानात्मक आहे. राहुलने सराव सामन्यात 60-70 धावा करून दाखवल्या आहेत. पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्कसारख्या गोलंदाजांचा त्याने सामना केला आहे. त्यामुळे अशीच दमदार खेळी त्याच्याकडून पुढील सामन्यात खेळली जाईल, अशी आशा द्रविडने व्यक्त केली.

के. एल. राहुलच्या फलंदाजीचा दर्जा आणि त्याची क्षमता आम्हाला माहिती आहे. ऑस्ट्रेलियातील पिचवर खेळण्यासाठी त्याच्यासारखाच फलंदाज महत्त्वाचा आणि गरजेचा असतो. राहुलच्या फलंदाजीच्या शैलीमध्ये वैविध्य आहे. तसेच बाऊन्स होणार्‍या चेंडूंवर बॅकफूटला जाऊन धावा घेण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. त्यामुळे तो या पिचवर नक्कीच उपयुक्त ठरू शकतो. त्याला फार फलंदाजी करता आलेली नाही; पण ज्याप्रकारे त्याने फलंदाजी केली आहे त्यात त्याने चांगले फटके खेळले आहेत हे विसरता येणार नाही, असे द्रविडने अधोरेखित केले.

Back to top button