भारतीय क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा जाहीर | पुढारी

भारतीय क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा जाहीर

जोहान्सबर्ग ; वृत्तसंस्था : भारतीय क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा जाहीर झाला असून, 17 डिसेंबरपासून हा दौरा सुरू होणार आहे. 41 दिवसांच्या दौर्‍यात टीम इंडिया कसोटी सामने, एकदिवसीय सामने आणि टी-20 सामने खेळणार आहे. भारताचा दौरा 26 जानेवारीला शेवटच्या टी-20 सामन्याने संपेल. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने गुरुवारी भारत दौर्‍याची घोषणा केली.

भारत या दौर्‍यात तीन कसोटी सामने, तीन एकदिवसीय आणि चार टी-20 सामने खेळणार आहे. भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 17 ते 21 डिसेंबरदरम्यान जोहान्सबर्ग येथे तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना खेळणार आहे. दुसरा कसोटी सामना 26 डिसेंबर ते 30 डिसेंबरदरम्यान सेंच्युरियन येथे खेळला जाईल. त्याचबरोबर तिसरा कसोटी सामना 3 जानेवारी ते 7 जानेवारीदरम्यान जोहान्सबर्गमध्ये पुन्हा खेळला जाईल. दोन्ही देशांदरम्यान खेळली जाणारी तीन सामन्यांच्या कसोटी मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग असेल.

तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर दोन्ही देशांदरम्यान 11 जानेवारीपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाईल. हे सामने केपटाऊन आणि पार्ल सिटीमध्ये खेळले जातील. यानंतर, 19 ते 26 जानेवारीदरम्यान दोन्ही देशांत चार सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाईल. मालिकेतील पहिले दोन सामने 19 व 21 रोजी न्यूलँडस्, केपटाऊन येथे खेळले जातील, तर इतर दोन सामने 23 आणि 26 जानेवारी रोजी बोलंड पार्क, पार्ली येथे खेळले जातील. भारतीय क्रिकेट संघाने अद्याप दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकलेली नाही.

भारताच्या दक्षिण आफ्रिका दौर्‍याचे वेळापत्रक

कसोटी मालिका :

पहिली कसोटी – 17 डिसेंबर ते 21 डिसेंबर, जोहान्सबर्ग
दुसरी कसोटी – 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर, सेंच्युरियन
तिसरी कसोटी – 3 जानेवारी ते 7 जानेवारी, जोहान्सबर्ग

एकदिवसीय मालिका :

पहिला सामना – 11 जानेवारी, बोलंड पार्क, पार्ल सिटी
दुसरा सामना – 14 जानेवारी, न्यूलँडस्, केपटाऊन
तिसरा सामना – 16 जानेवारी, न्यूलँडस्, केपटाऊन

टी-20 मालिका :

पहिला सामना – 19 जानेवारी, न्यूलँडस्, केपटाऊन
दुसरा सामना – 21 जानेवारी, न्यूलँडस्, केपटाऊन
तिसरा सामना – 23 जानेवारी, बोलंड पार्क, पार्ल सिटी
चौथा सामना – 26 जानेवारी, बोलंड पार्क, पार्ल सिटी

Back to top button