IND Vs SA : धोनीच्या शहरात टीम इंडियाची प्रतिष्ठा पणाला | पुढारी

IND Vs SA : धोनीच्या शहरात टीम इंडियाची प्रतिष्ठा पणाला

रांची, वृत्तसंस्था : माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या रांची शहरात होणार्‍या दुसर्‍या वन-डे सामन्यात भारताची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पहिला सामना हरल्यामुळे भारतीय संघापुढे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका (IND Vs SA) गमावण्याची भीती उभी राहिली आहे. टाचदुखीमुळे दीपक चहर मालिकेतून बाहेर झाला आहे. त्यामुळे कामचलाऊ गोलंदाजीच्या जोरावर भारताला या सामन्यात विजय मिळवावा लागेल.

फलंदाजीत श्रेयस अय्यरला आपला स्ट्राईक रेट वाढवावा लागेल; शिवाय सामना फिनिश करावा लागेल. उसळत्या चेंडूवर त्याला प्रभुत्व मिळवावे लागेल. संजू सॅमसनने गेल्या सामन्यात चांगली खेळी केली; पण टॉप ऑर्डरमधील शिखर धवन, ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल यांचे अपयश पराभवात रूपांतरित झाले.

दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेसाठी या सामन्यातील विजय महत्त्वाचा आहे. वर्ल्डकप-2023 मध्ये थेट प्रवेश मिळवायचा असेल, तर त्यांना या विजयाचे गुण आवश्यक आहेत.

दीपक चहरच्या जागी वॉशिंग्टन सुंदर (IND Vs SA)

दीपक चहर दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या वन-डे मालिकेतून बाहेर पडला आहे. भारताने त्याच्या जागी वॉशिंग्टन सुंदरचा संघात समावेश केला आहे. इंदूरमध्ये खेळल्या गेलेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात चहरला दुखापत झाली होती.दीपक चहर एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात खेळला नाही, आता तो संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे.

Back to top button