IND vs SA : ‘क्लीन स्विप’चे टार्गेट | पुढारी

IND vs SA : ‘क्लीन स्विप’चे टार्गेट

इंदूर : वृत्तसंस्था : भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना मंगळवारी होणार आहे. दुसर्‍या सामन्यात पाहुण्यांनी केलेली फलंदाजी पाहता तिसर्‍या सामन्यात भारतीय गोलंदाजांची अग्निपरीक्षाच असणार आहे. टीम इंडियाने ही मालिका जिंकली असल्याने काही खेळाडूंना विश्रांती मिळण्याची शक्यता आहे. मात्र, टी-20 वर्ल्डकपसाठी रवाना होण्यापूर्वी रोहित ब्रिगेड आणखी एक शानदार विजय मिळविण्याचा प्रयत्न करून ही मालिका 3-0 अशी जिंकण्याचा प्रयत्न करेल.

संयुक्त अरब अमिरातमध्ये झालेल्या यापूर्वीच्या टी-20 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचे आव्हान साखळी सामन्यांतच संपुष्टात आले होते. त्यानंतर भारतीय संघाच्या फलंदाजीत अनेक बदल पाहावयास मिळाले. मायदेशात प्रथम ऑस्ट्रेलिया आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेला पराभूत केल्यानंतर भारतीय फलंदाजी पुन्हा एकदा भक्कम वाटू लागली आहे. या आयसीसी स्पर्धेपूर्वी भारताचे आघाडीचे तीन फलंदाज फॉर्ममध्ये आहेत. राहुल, रोहित व कोहली यांना सूर गवसला असून, ते आक्रमक फटकेबाजी करत आहेत. भारताचा ए. बी. डिविलियर्स म्हणून ओळखला जाणारा सूर्यकुमार यादव सध्या धावांचा पाऊस पाडत आहे. हार्दिक पंड्या व दिनेश कार्तिक यांच्यात सामना फिरवण्याची क्षमता आहे.

कार्तिकला मोठ्या खेळीची प्रतीक्षा (IND vs SA)

तिसर्‍या टी-20 सामन्यात सूर्यकुमारला जर विश्रांती देण्यात आली, तर श्रेयश अय्यरला संधी मिळण्याची शक्यता आहे. तसेच ऋषभ पंतला या मालिकेत अद्याप फलंदाजी करण्याची संधी मिळालेली नाही. दिनेश कार्तिकला दुसर्‍या सामन्यात सात चेंडूच खेळावयास मिळाले. यामुळे त्याला मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. तसेच कोहलीला विश्रांती मिळण्याची शक्यता आहे.

भारतीय गोलंदाजी ठरतेय महागडी

भारतीय संघाची फलंदाजी समाधानकारक असली, तरी बुमराहच्या गैरहजेरीत भारतीय गोलंदाज खासकरून शेवटच्या हाणामारीच्या षटकांमध्ये जास्त धावा देत आहेत.

Back to top button