ICC T20 Team Ranking : भारताची अव्वल स्थानावरील पकड मजबूत | पुढारी

ICC T20 Team Ranking : भारताची अव्वल स्थानावरील पकड मजबूत

दुबई, वृत्तसंस्था : भारताने ट्वेंटी-20 मालिकेत ऑस्ट्रेलियावर विजय मिळवून आयसीसी ट्वेंटी-20 संघाच्या क्रमवारीत (ICC T20 Team Ranking) अव्वल स्थानावरील पकड अधिक मजबूत केली आहे. विराट कोहली व सूर्यकुमार यादव यांच्या वादळी अर्धशतकांच्या जोरावर भारताने तिसर्‍या ट्वेंटी-20त ऑस्ट्रेलियावर 6 विकेटस् राखून विजय मिळवला. भारताने हैदराबाद येथे झालेल्या सामन्यात विजय मिळवून तीन सामन्यांची मालिकाही 2-1 अशी जिंकली. या विजयानंतर भारताच्या आयसीसी टी-20 संघ मानांकन खात्यात एक गुणाची भर पडली आणि ते आता इंग्लंडपासून आणखी पुढे गेले आहेत.

भारताच्या खात्यात 268 रेटिंग पॉईंटस् झाले असून दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या इंग्लंडच्या खात्यात 261 रेटिंग पॉईंटस् आहेत. इंग्लंडला चौथ्या ट्वेंटी-20 सामन्यात पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला. हॅरीस रॉफने सलग दोन विकेटस् घेत सामना फिरवला आणि त्यानंतर मॅथ्यू मोट रन आऊट झाल्याने पाकिस्तानने तो सामना जिंकून मालिका 2-2 अशी बरोबरीत आणली. पाकिस्तान-इंग्लंड यांच्यात अजूनही तीन ट्वेंटी-20 सामने होणार आहेत आणि त्यानंतर ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धा आहे. भारतही घरच्या मैदानावर वर्ल्ड कपआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामने खळणार आहे. आफ्रिका व पाकिस्तान यांचे प्रत्येकी 258 रेटिंग पॉईंटस् आहेत आणि ते अनुक्रमे तिसर्‍या व चौथ्या क्रमांकावर आहेत. (ICC T20 Team Ranking)

इंग्लंडचा संघ पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत एक सामना जिंकला तरीही दुसर्‍या क्रमांकावर कायम राहणार आहे. दक्षिण आफ्रिका भारताविरुद्ध तीन सामने जिंकून आगेकूच करू शकते. न्यूझीलंड 252 पॉईंटसह पाचव्या क्रमांकावर आहे. वर्ल्ड कप स्पर्धेआधी न्यूझीलंड घरच्या मैदानावर पाकिस्तान व बांगलादेश यांच्याविरुद्ध प्रत्येकी 3 सामन्यांची ट्वेंटी-20 मालिका खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या खात्यातील एक गुण कमी झाला असून ते 250 पॉईंटस्सह सहाव्या क्रमांकावर आहेत. तेही वेस्ट इंडिज व इंग्लंड यांच्याविरुद्ध घरच्या मैदानावर 6 ट्वेंटी-20 सामने खेळणार आहेत.

Back to top button