सूर्यकुमार यादवने रिझवानला मागे टाकले | पुढारी

सूर्यकुमार यादवने रिझवानला मागे टाकले

हैदराबाद, वृत्तसंस्था : भारतीय संघाने तिसर्‍या ट्वेंटी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियावर 6 विकेटस् राखून विजय मिळवून मालिका 2-1 अशी जिंकली. सूर्यकुमारला प्लेअर ऑफ दी मॅचचा पुरस्कार दिला गेला. सूर्यकुमार यादव 36 चेंडूंत 5 चौकार व 5 षटकार खेचून 69 धावांवर झेलबाद झाला. याचबरोबर त्याने पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानला मागे टाकले.

2022 मध्ये आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 सर्वाधिक 682 धावांचा विक्रमही सूर्याने नावावर केला आहे. आयसीसीचे पूर्ण सदस्य असलेल्या संघांमध्ये 2022 साली ट्वेंटी-20 त सर्वाधिक धावांचा विक्रम पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानच्या नावावर होता. त्याने 556 धावा केल्या आहेत. निकोलस पूरन (553), सिकंदर रझा (516) व पथूम निसंका (499) हे त्याच्या मागे आहेत. पण, संलग्न सदस्यांचाही विचार केल्यास नेपाळचा दिपेंद्र सिंग 626 व झेक प्रजासत्ताकचा साबावून दाविझी 612 धावांसह रिझवानच्याही पुढे आहेत.

औषधे घेऊन सूर्या उतरला मैदानात 

बीसीसीआयने अक्षर पटेल व सूर्यकुमार यादव यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. यात सूर्यकुमार यादवला सामन्याआधी पोटात दुखत होते आणि तापही आल्याचे समोर आले. अक्षरने याबाबत जेव्हा सूर्याला विचारले तेव्हा तो म्हणाला, वातावरण बदलले होते आणि आपण प्रवासही केला होता. मला ताप आला होता आणि पोटातही दुखत होते. मी रात्री 3 वाजता डॉक्टर व फिजिओ यांच्याकडे गेलो. त्यांना सांगितले मला औषध द्या, इंजेक्शन द्या आणि मला आजच्या सामन्यासाठी तयार करा. हीच जर वर्ल्ड कप फायनल असती तर काय झाले असते? मी आजारपणाचे कारण देऊन बाहेर बसलो नसतो. मला सर्व परिस्थितीसाठी सज्ज राहायचे आहे. मी जेव्हा टीम इंडियाची जर्सी घालून मैदानावर उतरलो, तेव्हा सर्व आजारपण गायब झाले.

कर्णधार रोहित शर्माचा नववा मालिका विजय

पूर्ण वेळ कर्णधार झाल्यापासून रोहित शर्माने 9 मालिका विजय मिळवले आहेत. या टी-20 च्या सहा मालिका आहेत, तर दोन वन डे मालिका आहेत. तर एक कसोटी मालिका आहे.

पूर्णवेळ कर्णधार झाल्यानंतर रोहितचे मालिका विजय

न्यूझीलंड 3-0 ट्वेंटी-20 मालिका
वेस्ट इंडिज 3-0 वन डे मालिका
वेस्ट इंडिज 3-0 ट्वेंटी-20 मालिका
श्रीलंका 3-0 ट्वेंटी-20 मालिका
श्रीलंका 2-0 कसोटी मालिका
इंग्लंड 2-1 ट्वेंटी-20 मालिका
इंग्लंड 2-1 वन डे मालिका
वेस्ट इंडिज 3-1 ट्वेंटी-20 मालिका
ऑस्ट्रेलिया 2-1 ट्वेंटी-20 मालिका

Back to top button