ENGvsIND 4th test D5 : भारताने सामना जिंकत मालिकाही केली सेफ | पुढारी

ENGvsIND 4th test D5 : भारताने सामना जिंकत मालिकाही केली सेफ

लंडन : पुढारी ऑनलाईन

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटीच्या पाचव्या दिवशी ( ENGvsIND 4th test D5 ) इंग्लंडचा डाव २१० धावात गुंडाळत विजयी मोहर उमटवली. भारताने सामना १५७ धावांनी जिंकला. या विजयाबरोबरच भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत २ – १ अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतला अखेरचा सामना शिल्लक असल्याने टीम इंडिया मालिका गमावणार नाही याची काळजी या विजयाने घेतली गेली आहे.  पाचवा सामना मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॉफोर्डवर होणार आहे.

भारताकडून सर्वच गोलंदाजांनी प्रभावी मारा करत चौथ्या दिवशी चिवट फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडचे पाचव्या दिवशी तोंडचे पाणी पळवले. भारताकडून जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रभावी मारा केला. या तिघांनीही प्रत्येकी २ विकेट घेतल्या. उमेश यादवनेही शेवटच्या सत्रात तीन विकेट घेत भारताची विजयाची प्रतिक्षा फार लाबवली नाही.

भारताने पहिल्या डावात १९१ धावा केल्या होत्या. त्या प्रत्युत्तरात इंग्लंडने २९० धावा केल्या. दुसऱ्या डावात भारताने रोहितच्या ( १२७ )  दमदार फलंदाजीच्या जोरावर ४६६ धावांचा डोंगर रचला. त्यामुळे इंग्लंडसमोर ३६७ धावांचे आव्हान उभे राहिले. मात्र दुसऱ्या डावात त्यांना फक्त २१० धावाच करता आल्या.

पहिल्या सत्रात शार्दुलने फोडली पहिली हंडी

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटीच्या पाचव्या दिवशी ( ENGvsIND 4th test D5 ) इंग्लंडने बिनबाद ७७ धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली. सलामीवीर रोरी बर्न्स आणि हासीब हामीद या दोघांनी सावध फलंदाजी करत सलामी भागीदारी शतकापर्यंत नेली. दरम्यान बर्न्सने आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र जोडी ब्रेकर असलेल्या शार्दुल ठाकूरने बर्न्सला ५० धावांवर बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले.

बर्न्स बाद झाल्यानंतर सावध फलंदाजी करणाऱ्या हामीदनेही आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याला साथ देण्यासाठी आलेला डेव्हिड मलानही सावध पवित्र्यात होता. दरम्यान, अर्धशतकानंतर हामीदला आक्रमक फटका मारण्याचा मोह आवरला नाही. त्याने रविंद्र जडेजाला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र हा फटका थेट शॉर्ट मीड ऑनला उभ्या असलेल्या मोहम्मद सिराजकडे गेला.

मात्र सिराजने हा साधा झेल सोडला आणि सेट झालेल्या हामीदला जीवनदान दिले. त्यानंतर क्षेत्ररक्षणासाठी बदली खेळाडू म्हणून आलेल्या मयांक अग्रवाल आणि पंतने मिळून ३३ चेंडूत ५ धावा करणाऱ्या डेव्हिड मलानला धावबाद केले. मलान बाद झाला त्यावेळी इंग्लंडच्या १२० धावा झाल्या होत्या. त्यानंतर हामीद आणि कर्णधार जो रुटने इंग्लंडला उपहारापर्यंत १३१ धावांपर्यंत पोहचवले.

दुसऱ्या सत्राची दमदार सुरुवात ( ENGvsIND 4th test D5 )

उपहारापर्यंत इंग्लंडला रविंद्र जडेजाने मोठा धक्का दिला. त्याने सेट झालेल्या आणि चांगली फलंदाजी करत असणाऱ्या हासीब हामीदला ६३ धावांवर बाद केले. त्यानंतर जसप्रीत बुमराहने ऑली पोपचा २ धावांवर त्रिफळा उडवत इंग्लंडला चौथा धक्का दिला. बुमराहची ही कसोटीतील शंभरावी शिकार ठरली.

त्यानंतर बुमहारने जॉनी बेअरस्टोचा शुन्यावर त्रिफळा उडवत इंग्लंडचा पाचवा फलंदाज पॅव्हेलियनमध्ये धाडला. इंग्लंडचा निम्मा संघ माघारी गेल्यानंतर त्यांच्यावर पराभवाचे ढग दाटले. त्यातच जडेजाने मोईन अलीला शुन्यावर बाद करत इंग्लंडच्या अडचणीत अजूनच वाढ केली.

दुसऱ्या बाजूने चिवट फलंदाजी करणाऱ्या कर्णधार रूटने इंग्लंडला १५० धावांचा टप्पा पार करुन दिला. त्याच्या जोडीला आलेल्या ख्रिस वोक्सला साथीला घेत रुटने भागीदारी करण्यास सुरुवात केली. मात्र जोडी ब्रेकर शार्दुल ठाकूरने रुटची स्टम्प ३६ धावांवर उखडून टाकत भारताला सातवे यश मिळवून दिले.

त्यानंतर उमेश यादवने वोक्सला १८ धावांवर बाद करत इंग्लंडची शेवटची घटका जवळ आणली. मात्र चहापानाने इंग्लंडचा पराभव काही काळासाठी लांबला.

विजयी चहापान

चहापानाला आपले आठ फलंदाज माघारी गेलेल्या इंग्लंडने चहापानानंतर आपले द्विशतक पार केले. मात्र उमेश यादवने ग्रेग ओव्हरटर्नला १० धावांवर बाद करत इंग्लंडला ९ वा धक्का दिला. आता भारताच्या विजयाची फक्त औपचारिक्ताच बाकी होती. ही औपचारिक्ता उमेश यादवनेच संपवली. त्याने जेम्स अँडरसनला २ धावांवर बाद केले.

हेही वाचले का? 

Back to top button