IND A vs NZ A : कुलदीप यादवची हॅट्ट्रिक | पुढारी

IND A vs NZ A : कुलदीप यादवची हॅट्ट्रिक

चेन्नई ; वृत्तसंस्था : भारतीय ‘अ’ संघाकडून (IND A vs NZ A) खेळणार्‍या भारताचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने न्यूझीलंड ‘अ’ विरुद्धच्या दुसर्‍या वन-डे सामन्यात हॅट्ट्रिक केली. कुलदीपच्या भेदक मार्‍यामुळे न्यूझीलंडचा संघ 219 धावांत गारद झाला. त्यानंतर भारत ‘अ’ संघाने हे लक्ष्य 4 विकेटस् शिल्लक ठेवून 34 षटकांतच गाठलेे. चेन्नईमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात कुलदीपने वॅन बीक, जो वॉकर आणि जेकब डफी यांना बाद करत हॅट्ट्रिक केली.

प्रथम फलंदाजी करणार्‍या न्यूझीलंड ‘अ’ च्या डावातील 47 व्या षटकात कुलदीपने चौथ्या चेंडूवर एक विकेट घेतली. त्यानंतर पाचव्या चेंडूवर वॉकरला संजू सॅमसनकडे झेल देण्यास भाग पाडले. षटकाच्या शेवटच्या चेंडूवर कुलदीपने जेकबला पायचित बाद करत आपली हॅट्ट्रिक पूर्ण केले. या सामन्यात कुलदीपने 10 षटकांत 51 धावा देत 4 विकेटस् घेतल्या. कुलदीपबरोबरच ऋषी धवनने 2 तर राहुल चहरने 2 विकेटस् घेतल्या. उमरान मलिक आणि राज बावाने प्रत्येकी एक एक विकेट घेतल्या.

त्यानंतर भारत ‘अ’ संघाकडून (IND A vs NZ A) सलामीवीर पृथ्वी शॉ आणि ऋतुराज गायकवाड यांनी धडाकेबाज सुरुवात केली. दोघांनी 10 षटकांत 82 धावांची भागीदारी केली. ऋतुराज 30 धावांवर बाद झाला; परंतु पृथ्वीने अर्धशतक झळकावले. तो 48 चेंडूंत 77 धावा करून बाद झाला. यानंतर रजत पाटीदार (20) आणि कर्णधार संजू सॅमसन (37) यांनी मोर्चा सांभाळला. ऋषी धवन (22) आणि शार्दूल ठाकूर (25) यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले.

Back to top button