पुढारी ऑनलाईन डेस्क : काही दिवसांपूर्वी स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररने टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्याने काल (दि.२३ सप्टेंबर)टेनिस कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळला. शेवटचा सामना संपल्यानंतर टेनिस कोर्टवर भावूक क्षण पहायला मिळाला. फेडरच्या अखेरच्या सामन्यानंतर त्याचा कडवा प्रतिस्पर्धी राफेल नदाल डोळ्यातील अश्रू रोखू शकला नाही. या क्षणाचे फोटो सोशल मीडियीवर काही क्षणात व्हायरल झाले. हे फोटो अनेक जणांनी शेअर केले. यामध्ये विराट कोहलीचादेखील समावेश होता.
फेडरर आणि नदाल यांचा फोटो शेअर करताना विराट लिहतो, "कोणाला वाटले होते की प्रतिस्पर्धी एकमेकांविषयी इतका आदर करू शकतात. हेच खेळाचे खरे सौंदर्य आहे. आत्तापर्यत पाहिलेला स्पोर्ट्समधील हा सर्वांत सुंदर फोटो आहे. जेव्हा तुमच्या साथीदाराच्या डोळ्यात तुमच्यासाठी अश्रू येतात. तुम्हाला देवाने दिलेल्या प्रतिभेने हे करू शकलात. या दोघांना आदर…"
लंडनमधील लॅव्हर कपमध्ये राफेल नदालसोबत फेडररने दुहेरीचा सामना खेळला. टीम युरोपच्या फेडरर आणि नदाल जोडीला टीम वर्ल्डच्या फ्रान्सिस टियाफो आणि जॅक सॉक यांच्याकडून ४-६, ७-६ (७/२), ११-९ असा पराभव पत्करावा लागला. हा सामना झाल्यानंतर फेडररने नदालची गळाभेट घेतली आणि दोघेही भावूक झाले. यावेळी दोघेही अश्रू आवरु शकले नाहीत. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
टेनिस कोर्टवर कडवे प्रतिस्पर्धी असणारे हे दोघे खेळाडू टेनिस कोर्टबाहेर चांगले मित्र आहेत. अखेरचा सामना नदालसोबत खेळण्याची फेडररची इच्छा होती. त्याची ही इच्छा पूर्ण झाली. फेडररने दोन दशकांच्या आपल्या टेनिस कारकिर्दीत १,२५१ सामने खेळले आहेत. त्याने २० ग्रँडस्लॅम विजतेपदे जिंकली आहेत. स्पेनचा नदाल हा फेडररचा जवळपास दोन दशकांहून अधिक काळ कडवा प्रतिस्पर्धी राहिला हाेता.
२००४ मध्ये पहिल्यांदा या दोघांची भेट झाली होती. ते ९ ग्रँडस्लॅम फायनलसह ४० वेळा खेळले आहेत. नदालने २४-१६ असा जिंकण्याचा विक्रम केला आहे. पुरुष एकेरीची विक्रमी २२ ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या नदालने म्हटले आहे की, अखेरच्या सामन्यात पराभव झाला. यामुळे फेडररसाठी भावनिकदृष्ट्या ही कठीण प्रसंग होता. "माझ्यासाठी आमच्या खेळाच्या इतिहासातील या संस्मरणीय क्षणाचा एक भाग बनणे हा खूप मोठा सन्मान आहे. त्याचवेळी अनेक वर्षांनी अनेक गोष्टी एकत्र शेअर करता आल्या," असे नदालने फेडररबद्दल सांगितले.
हेही वाचा;