INDvsAUS T20 : टीम इंडियासाठी 'करो या मरो' सामना | पुढारी

INDvsAUS T20 : टीम इंडियासाठी 'करो या मरो' सामना

पुढारी ऑनलाईन डेस्क : पहिल्या सामन्यात मोठ्या धावसंखेचा बचाव करण्यात अपयशी ठरलेल्या भारतीय संघाला  मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी आज, शुक्रवारी नागपुरात होणारा दुसरा टी-20 सामना जिंकावाच लागेल. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला पहिल्या टी-20 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे भारतीय संघ मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. अशा स्थितीत नागपुरातील पुढील सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापन प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल करण्याचा विचार करू शकतात, असेही मानले जात आहे.  (INDvsAUS T20)

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सूत्राने नागपूर टी-20 मध्ये बुमराहच्या निवडीबद्दल सांगितले की, संघ व्यवस्थापन त्याच्याबद्दल घाई करू इच्छित नाही, म्हणूनच बुमराहने मोहाली टी-20 खेळला नाही. पण तो नेटमध्ये गोलंदाजी करत असून तो अ‍ॅक्शनसाठी सज्ज आहे. जसप्रीत बुमराहने नागपूर टी-20 मध्ये पुनरागमन केले तर उमेश यादव बाहेर जाणे निश्चित आहे. उमेश आगामी विश्वचषक संघाचा भाग नाही, मालिका सुरू होण्यापूर्वी कोव्हिड-19 मुळे प्रभावित झालेल्या मोहम्मद शमीच्या जागी त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे. जसप्रीत बुमराह इंग्लंड दौर्‍यात दुखापत झाल्याने संघाबाहेर आहे. वेस्ट इंडिज दौर्‍यात तसेच आशिया कपमध्ये तो टीम इंडियाचा भाग नव्हता. एनसीएमध्ये पुनर्वसन पूर्ण केल्यानंतर बुमराह आता संघात परतला आहे.

भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार महागडा ठरत आहे. त्याने पाकिस्तान, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या महत्त्वाच्या 19 व्या षटकांत 49 धावा दिल्या आहेत. त्यामुळे बुमराहचे फिट होणे भारतासाठी निकडीचे बनले आहे. वर्ल्डकपपूर्वी भारताला मोजून पाच टी-20 सामने खेळावयाचे असून यात त्यांना आपल्या कमकुवत बाजू सुधाराव्या लागतील.
हैदराबादमध्ये तिकिटासाठी चेंगराचेंगरी

या सामन्याची तिकिटे खरेदीसाठी गुरुवारी जिमखाना मैदानावर तिकिटांसाठी क्रिकेट चाहत्यांची मोठी गर्दी झाल्याने चेंगराचेंगरी झाली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला, त्यात अनेक जण जखमी झाले. रात्री उशिरापासूनच चाहते तिकीट खरेदीसाठी स्टेडियमबाहेर पोहोचू लागले. सकाळ होत गेली तसतशी गर्दी वाढत गेली, त्यामुळे चेंगराचेंगरी झाली.

हेही वाचा;

 

Back to top button