Icc T20 Latest Ranking : सूर्यकुमारची टॉप-3 मध्ये झेप | पुढारी

Icc T20 Latest Ranking : सूर्यकुमारची टॉप-3 मध्ये झेप

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारतीय संघातील आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादवला सध्याच्या काळातील टी-20 मधील जगातील अनेक चांगल्या फलंदाजांपैकी एक समजले जाते. त्याने मंगळवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात 46 धावांची आक्रमक खेळी केली होती. या कामगिरीच्या बळावर सूर्यकुमार यादवने आयसीसी टी-20 क्रमवारीत (Icc T20 Latest Ranking) टॉप-3 मध्ये स्थान मिळविले आहे.

उल्लेखनीय म्हणजे सूर्यकुमारने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला मागे टाकले. आझम क्रमवारीत आता चौथ्या स्थानावर घसरला आहे. पाकचा मोहम्मद रिझवानने अव्वल स्थान आपल्याकडेच कायम राखले आहे. तर दुसर्‍या स्थानावर दक्षिण आफ्रिकेचा अ‍ॅडम मार्करम कायम आहे. (Icc T20 Latest Ranking)

दरम्यान, गोलंदाजीत अफगाणिस्तानचा लेगस्पिनर राशिद खानला क्रमवारीत एक स्थानाचा लाभ मिळाला असून तो चौथ्या स्थानी पोहोचला आहे.सूर्यकुमारने ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात 25 चेंडूंत 46 धावांचा पाऊस पाडला. यामुळे त्याचे रेटिंग पॉईंट 780 इतके झाले. तर पहिल्या स्थानावरील मोहम्मद रिझवानचे 825 रेटिंग गुण आहेत. तसेच इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात 31 धावांची खेळी करणार्‍या पाकच्या बाबर आझमचे 771 गुण आहेत. सूर्यकुमार यादव हा आझमपेक्षा 9 रेटिंग गुणांनी आघाडीवर आहे. सूर्यकुमारचा अपवाद वगळता अन्य कोणताही फलंदाज या क्रमवारीत टॉप 10 मध्ये स्थान मिळवू शकला नाही. गोलंदाजीत भुवनेश्वर कुमार सातव्या स्थानावरून नवव्या स्थानी घसरला आहे. (Icc T20 Latest Ranking)

हार्दिक पंड्या पाचव्या स्थानी

टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्यालाही ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेल्या कामगिरीचा चांगला लाभ मिळाला. टी-20 अष्टपैलूच्या क्रमवारीत हार्दिकने टॉप-5 मध्ये स्थान मिळविले आहे. त्याने सातव्या स्थानावरून पाचव्या स्थानी झेप घेतली आहे. त्याचे 180 रेटिंग गुण आहेत. या क्रमवारीत बांगला देशचा शाकिब अल हसन अव्वल स्थानावर आहे.


अधिक वाचा :

Back to top button