Asia Cup : आशिया चषकातून भारताने बोध घेण्यासारख्या सहा गोष्टी | पुढारी

Asia Cup : आशिया चषकातून भारताने बोध घेण्यासारख्या सहा गोष्टी

नुकत्याच झालेल्या आशिया चषकात (Asia Cup) सर्वांना धक्का देत श्रीलंकेने विजेतेपद मिळवले. भारत तर सुपर-4 फेरीतच बाद झाला. या पराभवातून टीम इंडियाच्या थिंक टँकने काही गोष्टींचा बोध घेण्याची गरज आहे.

1) रँकिंग कुचकामी :

टी-20 क्रिकेटचा विचार करता भारतीय संघ अव्वल स्थानावर आहे, तर श्रीलंकेचे स्थान आठवे आहे, तरीही त्यांनी भारत आणि पाकिस्तान यांना हरवून आशिया चषक जिंकला. याचा अर्थ मैदानावर आयसीसी रँकिंग काहीही उपयोगाचे नसते तर चांगला खेळ दाखवावा लागतो.

2) सुपरस्टार गरजेचे नसतात :

भारतीय संघात अनेक सुपरस्टार खेळाडूंचा भरणा आहे. श्रीलंकेच्या एकाही फलंदाजाने स्पर्धेत 200 धावा केल्या नसतील. पण प्रत्येकाने केलेल्या छोट्या छोट्या खेळी संघाला विजयापर्यंत घेऊन गेल्या. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. तो एकट्याच्या जीवावर जिंकायचा नसतो, हेच त्यांनी दाखवून दिले.

3) योग्य वेळी योग्य कामगिरी हवी :

अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताकडून विराट कोहलीने शतक तर भुवनेश्वर कुमारने पाच विकेट घेतल्या. स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्यावर या खेळीचा संघासाठी उपयोग शून्य ठरला. याचसारख्या खेळी जर पाकिस्तान किंवा श्रीलंकेविरुद्ध झाल्या असत्या तर त्याला महत्त्व होते.

4) दबावात संधी साधणे गरजेचे : 

ट्वेंटी-20 क्रिकेट हे प्रेशर गेमचे क्रिकेट आहे. या 40 षटकांचा दबाव जो झेलतो, तोच यातून पार पडतो. पाकिस्तानसाठी मोहम्मद नवाजने भारताविरुद्ध आणि अफगाणिस्तानविरुद्ध दबाव झुगारून खेळ केला म्हणून संघ जिंकला. वानिंदू हसरंगाने पाकिस्तानविरुद्ध पहिल्या तीन षटकांत जास्त धावा गेल्या असतानाही चौथ्या षटकांत 3 विकेट घेत सामना फिरवला. अशी कामगिरी भारताकडून हार्दिक पंड्या वगळता कोणाचीही झाली नाही. हार्दिकने पाकिस्तानविरुद्ध दबावमुक्त खेळी केली होती.

5) गोलंदाजी महत्त्वाची :

फलंदाजांइतकीच गोलंदाजी फळी भक्कम असेल तरच सामने जिंकता येतात. भारताची या स्पर्धेतील गोलंदाजी अलीकडील काळातील सर्वात कमजोर गोलंदाजी होती. याउलट पाकिस्तानने शाहीन शाह आफ्रिदीच्या अनुपस्थितीत चांगली गोलंदाजी केली.

6) अलीकडील काळात फिल्डिग, कॅचिंग, रनिंग या क्षेत्रात भारतने दमदार कामगिरी केली आहे. परंतु आशिया चषकात भारत या तिन्ही क्षेत्रांत मागे पडल्याचे दिसत होते. पाकिस्तानविरुद्ध अर्शदीपने सोडलेला झेल आपणाला किती महागात पडला ते आपण जाणतोच. पण धावचितच्या अनेक संधी आपण गमावल्या हे वास्तव नाकारता येत नाही. धावांसाठी श्रीलंकन फलंदाज जीव तोडून डाय मारताना दिसत होते. तो जोश भारतीय फलंदाजात नव्हता. (Asia Cup)

Back to top button