Asia Cup 2022 : रोहित ब्रिगेडची अग्‍निपरीक्षा, आज अफगाणिस्तानशी सामना | पुढारी

Asia Cup 2022 : रोहित ब्रिगेडची अग्‍निपरीक्षा, आज अफगाणिस्तानशी सामना

दुबई ; वृत्तसंस्था : आशिया चषक (Asia Cup 2022) क्रिकेट स्पर्धेत सुपर-4 मध्ये प्रथम पाक आणि त्यानंतर श्रीलंकेकडून पराभव स्वीकारावा लागल्याने टीम इंडियाचे अंतिम फेरीत पोहोचण्याची आशा जवळ जवळ संपुष्टात आली आहे. बिकट स्थितीत पोहोचलेल्या भारताची गाठ आज (गुरुवारी) अफगाणिस्तानशी पडणार आहे. या सामन्यात विजय मिळवण्याचा प्रयत्न रोहितसेना करणार करणार आहे.

भारत आणि अफगाणिस्तानचा संघ आपले अस्तित्व टिकवण्यासाठी विजयाच्या निर्धाराने मैदानात उतरतील. उल्लेखनीय म्हणजे टीम इंडियाला आशिया चषक स्पर्धेच्या जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानण्यात येत होते. मात्र, सुपर-4 मध्ये पाक आणि श्रीलंकेकडून पराभव स्वीकारावा लागल्याने हा संघ पूर्णपणे बॅकफूटवर गेला आहे. टीम इंडियाचे स्पर्धेतील आव्हान जवळ जवळ संपुष्टात आल्यातच जमा आहे. टीम इंडियाने अफगाणिस्तानला गुरुवारी पराभूत केले तरी अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आशा जवळ जवळ कमीच आहेत. यामुळे अस्तित्वासाठी अग्‍निपरीक्षाच द्यावी लागणार आहे.

अफगाणिस्तानविरुद्धचा सामना भारतासाठी ‘करो या मरो’सारखा असणार आहे. कारण जर का या सामन्यात अपयश आले तर भारताला पराभवाच्या हॅट्ट्रिकच्या नामुष्कीला सामोरे जावे लागेल. दरम्यान, या स्पर्धेत अफगाणिस्तानने चांगले प्रदर्शन केले आहे. पहिल्या सामन्यात श्रीलंकेला अवघ्या 10.1 षटकांत उखडून अन्य संघांना एकप्रकारचा इशाराच दिला.

दुबई आणि शाहजाहची खेळपट्टी राशिद खान व मुजीब उर रेहमानसाठी चांगलीच लाभदायी ठरते. तर रहमानुल्लाह गुरुबाज व नजीबुल्लाह जादरान यांनी अनेक विजयी खेळ्या केल्या आहेत. यामुळे भारतासाठी अफगाणिस्तानला कमी लेखण्याची चूक करणे प्रसंगी महागात पडू शकते. भारताच्या आघाडीच्या फळीतील राहुल, रोहित आणि विराट कोहली यांना संघाला मजबूत स्थिती प्राप्‍त करून द्यावी लागणार आहे, तर मधल्या फळीतील फलंदाजानांही जबाबदारीने फलंदाजी करावी लागणार आहे. तर भुवनेश्‍वर, अर्शदीप, हार्दिकला भेदक मारा करावा लागेल. तसेच चहल की अश्‍विन, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

संघ यातून निवडणार : (Asia Cup 2022)

भारत : रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, दीपक हुडा, रविचंद्रन अश्‍विन, भुवनेश्‍वर कुमार, अर्शदीप सिंग, यजुवेंद्र चहल.

अफगाणिस्तान : जजई, रहमानुल्ला गुरबाज, इब्राहिम जदरान, नजीबुल्लाह जादरान, मोहम्मद नबी, राशिद खान, करीम जनत, शिनवारी, नवीन-उल-हक, मुजीब, फजलहक फारूकी.

भारत वि. अफगाणिस्तान

स्थळ : दुबई इंटरनॅशनल स्टेडियम
वेळ : रात्री 7.30 वा. पासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस्

Back to top button