
पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने रविवारी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर पत्रकार परिषदेत कसोटी कर्णधारपद सोडल्याचा मुद्दा उपस्थित केला. तो म्हणाला होता की, "बर्याच लोकांकडे माझा नंबर आहे आणि बरेच लोक टीव्हीरून सल्ले देतात; पण ज्यांच्याकडे माझा नंबर आहे त्यापैकी कोणीही मला मेसेज केला नाही. मला फक्त एका व्यक्तीचा मेसेज आला आणि तो म्हणजे महेंद्रसिंग धोनी." कोहलीने हा टोला त्याच्यावर सातत्याने टीका करणाऱ्यांना लगावला होता. ज्याचे पडसाद आता उमटत आहेत. (Sunil Gavaskar on Virat Kohli)
सूत्रांच्या माहितनूसार, विराटच्या त्या वक्तव्याने अनेक माजी दिग्गज क्रिकेटपटू नाराज झाले आहेत; पण ते उघडपणे विराटच्या वक्तव्याचा समाचार घेण्यापासून अलिप्त आहेत. मात्र भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी उघडपणे विराटच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. कसोटी कर्णधारपद सोडल्यानंतर विराट कोहलीने ज्या खेळाडूने बोलावणे अपेक्षित होते त्याचे नाव द्यावे, असे आवाहन गावस्कर यांनी केले आहे. तो कोणत्या प्रकारच्या संदेशाची वाट पाहत होता हे देखील सांगायला हवे, असा टोमणाही त्यांनी मारला आहे. (Sunil Gavaskar on Virat Kohli)
रविवारी आशिया चषक स्पर्धेतील सुपर 4 फेरीतील सामन्यात पाकिस्तानने भारताचा पाच गडी राखून पराभव केला. सामना आयाजित पत्रकार परिषदेतकसोटी कर्णधारपद सोडल्यानंतर काय घडले याचा उल्लेख करत विराटने खळबळजनक विधान केले होते.
कोहलीच्या तक्रारीबाबत विचारले असता गावस्कर यांनी एका यूट्यूब चॅनलला मुलाखत देताना मोठे विधान केले. ते म्हणाले की, "विराट कोणाचा उल्लेख करत आहे हे सांगणे फार कठीण आहे? जर त्याने नाव घेतले असते तर तुम्ही त्या संबंधीत व्यक्तीला विचारू शकता की, तुम्ही विराशी संपर्क साधला आहे की नाही. मी जे ऐकलंय ते सर्वांनी ऐकलंय आणि पाहिलंय. तो म्हणत आहे की, कसोटी कर्णधारपद सोडल्यानंतर त्याला केवळ महेंद्रसिंग धोनीने फोन केला होता. आता तो त्याच्यासोबत (विराट कोहली) खेळलेल्या माजी खेळाडूंबद्दल बोलत असेल तर टीव्हीवर कोण कोण येतो हे आपल्याला माहीत आहे. विराट ज्या खेळाडूंचा उल्लेख करत आहे त्यांचे नाव त्याने द्यावे. आणि नाव समजल्यावर संबंधिताला आपण विचारू की, तू विराटला त्याला का मेसेज केला नाहीस?, असाही टोलाही गावस्करांनी लगावला.
"त्याला काय संदेश हवा होता? प्रोत्साहन? पण त्याने कर्णधारपद सोडले होते; मग त्याला प्रोत्साहनाची काय गरज होती? तो अध्याय (कर्णधारपद) आधीच बंद झाला होता. 1985 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये बेन्सन अँड हेजेस वर्ल्ड क्रिकेट चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर जेव्हा मी कर्णधारपद सोडले होते. तेव्हा माझ्यासाठी कोणताही विशिष्ट संदेश किंवा कॉल आला नव्हता. 1985 मध्ये (बेन्सन अँड हेजेस) क्रिकेट वर्ल्ड चॅम्पियनशिपनंतर मी कर्णधारपद सोडले. त्या रात्री आम्ही आनंद साजरा केला, एकमेकांना मिठी मारली, पण यातून तुम्हाला आणखी काय अपेक्षित आहे?, असेही ते म्हणाले.