Asia Cup 2022 : रोमहर्षक सामन्यात भारतावर पाकिस्तानचा ५ विकेट्स राखून विजय | पुढारी

Asia Cup 2022 : रोमहर्षक सामन्यात भारतावर पाकिस्तानचा ५ विकेट्स राखून विजय

दुबई; पुढारी ऑनलाईन : आशिया चषकातील (Asia Cup 2022) सुपर ४ मधील दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने भारताला ५ विकेट्सने पराभूत करत साखळी सामन्यातील पराभवाचा बदला घेतला. भारताने ठेवलेल्या १८२ धावांचा आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानने ५ विकेट्स गमावत १८२ धावा करुन भारताला पराभूत केले. मोहम्मद रिझवान याच्या खेळीने पाकिस्तानने भारताकडून विजय हिसकावून घेतला.

पाकिस्तानचा (Asia Cup 2022) विकेट किपर मोहम्मद रिझवान याची अर्धशतकी खेळी आणि अखेरच्या षटकात खुर्शीद शाह आणि आसिफ अली यांच्या फटकेबाजीने हा महत्त्वपूर्ण सामना पाकिस्तानने खिशात घातला. रिझवानने ५१ चेंडूत ७१ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने २ षटकार व ६ चौकार लगावले. त्याला मोहम्मद नवाज याने चांगली साथ दिली. त्याने २० चेंडूत ४२ धावांची खेळी केली. नवाज याला या सामन्यात फलंदाजीमध्ये बडती दिली होती. सुरुवातीला कर्णधार बाबर आझमला लवकर बाद करण्यात भारताने यश मिळवले होते. रवी बिश्नोई याने पावर प्लेमध्येच बाबरला बाद केले. त्याने १० चेंडूत १४ धावांची खेळी केली. बाबर नंतर फकर जमान याने काही काळ रिझवानला साथ दिली. त्याने १८ चेंडूत १५ धावांची खेळी केली. खुर्शीद शाह हा ११ चेंडूत १४ धावांवर नाबाद राहिला तर असिफ अली याने ८ चेंडूत १६ धावा करुन बाद झाला.

आजच्या सामन्यात भारताच्या (Asia Cup 2022) गोलंदाजीला प्रभाव टाकता आला नाही. भारताने रवी बिश्नोई याला स्थान देत एक जलद गती गोलंदाज कमी केला होता. त्याच बरोबर दीपक हुडा याला संघात स्थान देण्यात आले होते. अर्शदीप सिंग, भूवनेश्वर कुमार, हार्दीक पंड्या, रवी बिश्नोई आणि यझुवेंद्र चहल यांना १ -१ बळी घेता आले.

Back to top button