Asia Cup 2022 : भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार, महामुकाबल्यासाठी सज्ज रहा! | पुढारी

Asia Cup 2022 : भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार, महामुकाबल्यासाठी सज्ज रहा!

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारत विरुद्‍ध पाकिस्‍तान सामना क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणीचा असतो. हे दोन्‍ही संघ आमने-सामने आले की, क्रिकेटप्रेमींवर थरार, उत्‍कंठा आणि रोमहर्षक क्षणांची बरसातच होते. हे सारे भारतीय क्रिकेट रसिकांनी (Ind Vs Pak Asia Cup) मागच्या महिन्यात म्हणजे २८ ऑगस्ट रोजी अनुभवलं आहे. आता आशिया चषक स्‍पर्धेत अंतिम सामन्यापूर्वी पुन्‍हा एकदा हे दोन्‍ही संघ आमने-सामने येणार आहेत.

आशिया चषक स्‍पर्धेतील पहिल्‍याच सामन्‍यात टीम इंडियाने पाकिस्‍तानचा धुव्‍वा उडवला. शेवटच्‍या षटकापर्यंत उत्‍कंठा वाढविणारा हा सामना भारताने पाच गडी राखून जिंकला. तब्‍बल १० महिन्‍यांनंतर दोन्‍ही संघांमधील सामना क्रिकेटप्रेमींसाठी खास ठरला. आशिया चषक स्‍पर्धेत एकुण ६ संघ सहभागी झाले आहेत. ३-३ अशा दोन ग्रुपमध्‍ये त्‍यांची विभागणी आहे. ग्रुप-एमध्‍ये भारत, पाकिस्‍तान आणि हॉगकाँगचा समावेश आहे. तर ग्रुप-बीमध्‍ये अफगाणिस्‍तान, श्रीलंका आणि बांगलादेश या संघाचा समावेश आहे. भारताने पाकिस्तान आणि हाँगकाँग विरुद्धचे दोन्ही साखळी सामने जिंकून ग्रुप-एमध्‍ये प्रथम क्रमांक मिळवला. तर आपल्या दुस-या साखळी सामन्यात हॉगकाँगचा पराभव करून पाकिस्‍तान दुसर्‍या स्‍थानी राहिले.

याचबरोबर सुपर 4 मध्ये ग्रुप ए मधून भारत, पाकिस्तान (Ind Vs Pak Asia Cup) यासह ग्रुप बी मधून अफगाणिस्तान श्रीलंका पोहचले आहे. या फेरीत प्रत्येक संघ एकमेकांना भीडणार असून त्यांना प्रत्येकी तीन सामने खेळायचे आहेत. या फेरीतील पहिला सामना भारत-पाकिस्तान यांच्यात होणार असून उभय संघ एकाच स्पर्धेत दुस-यांदा आमने-सामने येणार आहेत. त्यामुळे जगभरातील क्रिकेट चाहत्यांना ‘महामुकाबला’ पाहण्याची सुवर्ण संधी लाभणार आहे. सुपर-4 मधील विजयावरच भारताचा अंतिम सामन्‍यातील प्रवेश निश्‍चित होणार आहे. भारत आणि पाकिस्‍तान यांनी सुपर-4 मध्‍ये आपले सामने जिंकल्‍यास दोन्‍ही संघ अंतिम सामन्‍यातही भिडतील. आणि हा सामना रविवार, ११ सप्‍टेंबर रोजी होईल.

Back to top button