पाकिस्तानच्या सामन्यानंतर हार्दिक पंड्या याची वाढली जाहिरात ‘ब्रँड व्हॅल्यू’
मुंबई ; वृत्तसंस्था : भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या याच्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर भारतीय संघ पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात 5 विकेटस् राखून विजय मिळवू शकला. त्याच्या या खेळीने संघाला फायदा झालाच आहे; परंतु आता त्याला वैयक्तिक पातळीवरसुद्धा फायदा होत असून, त्याची 'ब्रँड व्हॅल्यू' कमालीची वाढली आहे. जाहिरात विश्वात त्याला दिवसेंदिवस मागणी वाढत आहे.
आयपीएल 2022 पासून पंड्या एका चांगल्याच फॉर्मात दिसून आला आहे. आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स या नवख्या संघाचे नेतृत्व करत पहिल्याच वर्षी या संघाला त्याने जेतेपदाचा मान मिळवून दिला. आयपीएलमधील त्याच्या याच उत्कृष्ट खेळीच्या जोरावर त्याची आशिया संघात निवड झाली आणि त्याने कमाल करून दाखवली. क्रिकेट क्षेत्रातील या यशानंतर व्यावसायिक क्षेत्रातही हार्दिक बाजी मारताना दिसत आहे.
हार्दिक आता सचिन, धोनी, रोहितच्या लाईनमध्ये
क्रिकेटपटूची प्रत्येक सामन्यातील खेळी आणि त्यानंतर त्याला मिळणारी प्रसिद्धी, त्यांची होणारी वाहवा ही त्यांच्या विकासासाठी तितकीच महत्त्वाची ठरते. तितकीच लोकप्रियतादेखील त्यांना मिळते. तर याच लोकप्रियतेचा उपयोग विविध ब्रँड करून घेत असतात. आपल्या ब्रँडच्या जाहिरातीसाठी ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून या प्रसिद्ध खेळाडूंची निवड केली जाते. सचिन तेंडुलकर, एम. एस. धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा हे जाहिरात विश्वातील लोकप्रिय असे चेहरे आहेत. अनेक विविध ब्रँडच्या जाहिरातींमध्ये हे चेहरे आपण पाहिले असतील. आता हार्दिक पंड्यादेखील या खेळाडूंसोबत अनेक विविध ब्रँडचा चेहरा म्हणून आपल्याला दिसू शकतो.
पंड्याचा वाढता आर्थिक आलेख
हार्दिक पंड्यासाठी 'राईज स्पोर्टस्' ही कंपनी ब्रँड मॅनेजर म्हणून काम पाहते. या कंपनीने पंड्याच्या आर्थिक आलेखाबद्दल माहिती दिली आहे. या कंपनीच्या म्हणण्यानुसार, 6 ते 7 मोठे ब्रँड हार्दिकला करारबद्ध करू इच्छितात. पंड्याने त्याच्या जाहिरात फीमध्येदेखील मोठी वाढ केली आहे. म्हणजेच आता एका ब्रँडच्या जाहिरातीसाठी हार्दिक दिवसाला तब्बल 2 कोटी रुपये मानधन घेतो. आशिया कपमधील त्याच्या उत्कृष्ट खेळीने हार्दिकची ब्रँड व्हॅल्यू 30 ते 40 टक्क्यांनी वाढली आहे. हार्दिक एखाद्या ब्रँडबरोबर करार करताना, त्यांच्याकडून दोन दिवसांची कमिटमेंट घेतो. जेणेकरून तो ब्रँड कमीत कमी 2 दिवसांत त्याला 4 कोटी रुपये मिळवून देतो.
सोशल मीडिया पोस्टने लाखोंची कमाई
हार्दिकच्या या खेळीमुळे तो इतका प्रसिद्ध झाला आहे की, सध्या तो 8 ते 10 ब्रँडची जाहिरात करत आहे. आता या ब्रँडमध्ये 5 ते 6 नव्या ब्रँडची भर पडणार आहे. सोशल मीडियावरून प्रमोशनसाठीच्या पोस्टकरिता तो प्रतिपोस्ट 40 लाख रुपये मानधन घेतो. विराट कोहली आणि रोहित शर्मा या क्रिकेटपटूंनंतर सर्वाधिक प्रसिद्ध आणि फॉलोव्हर्स असणारा हार्दिक पंड्या तिसरा खेळाडू आहे.