आशिया चषक स्पर्धेतून दीपक चहर याची माघार? | पुढारी

आशिया चषक स्पर्धेतून दीपक चहर याची माघार?

दुबई ; वृत्तसंस्था : आशिया चषकासाठी दुबईत दाखल झालेल्या भारतीय संघाला आणखी एक धक्का बसला आहे. आशिया चषक स्पर्धेसाठी राखीव गोलंदाज म्हणून निवड झालेल्या दीपक चहर याने दुखापतीतून माघार घेतल्याचे वृत्त समोर आले आहे.

आशिया चषक स्पर्धा सुरू होण्यास दोन दिवस राहिले आहेत आणि तरीही भारतीय संघामागे लागलेले विघ्न काही केल्या कमी होताना दिसत नाही. जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल या दोन प्रमुख गोलंदाजांनी दुखापतीमुळे आधीच आशिया चषक स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यात कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना संघासोबत दुबईत जाता आलेले नाही. आता दीपक चहरच्या माघारीचे वृत्त समजते आहे.

दीपक चहरला दुखापत झाली आहे आणि त्याच्याजागी 25 वर्षीय कुलदीप सेन याची निवड केली गेली आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये मध्य प्रदेशकडून व आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणार्‍या कुलदीपचा राखीव खेळाडू म्हणूनच संघात समावेश केला गेला आहे. 27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर या कालावधीत आशिया चषक स्पर्धा होणार आहे. श्रीलंका व अफगाणिस्तान यांच्यात सलामीचा सामना होणार आहे. भारताचा पहिला सामना 28 ऑगस्ट रोजी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.

भारताच्या 15 सदस्यीय संघात भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग व आवेश खान हे तीन जलदगती गोलंदाज आहेत. चहरने 6 महिन्यांनंतर झिम्बाब्वे दौर्‍यातून पुनरागमन केले. आशिया चषक स्पर्धेत त्याची राखीव खेळाडू म्हणून निवड झाली होती. श्रेयस अय्यर व अक्षर पटेल यांचीही राखीव खेळाडू म्हणून निवड झाली आहे. कुलदीप सेनचे प्रशिक्षक अरिल अँथोनी यांनी सांगितले की, दीपक चहर या स्पर्धेला दुखापतीमुळे मुकणार आहे आणि कुलदीपची भारतीय संघात निवड झाली आहे.

कुलदीपचा भाऊ जगदीप सेन यानेही ‘बीसीसीआय’चे निवड समिती प्रमुख चेतन शर्मा यांनी 22 ऑगस्ट रोजी कॉल केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. त्यांनी त्याला संघात निवड झाल्याचे सांगितले. आयपीएल 2022 मध्ये राजस्थान रॉयल्सने 20 लाखांत कुलदीपला आपल्या ताफ्यात घेतले. त्याने 7 सामन्यांत 8 विकेटस् घेतल्या होत्या.

हाँगकाँगने मिळवली पात्रता

दुबई : संयुक्त अरब अमिरात येथे होणार्‍या आशिया कपसाठी पात्रता फेरीतून जिंकत हाँगकाँगचा संघ ‘अ’ गटात सामील झाला आहे. ‘अ’ गटात भारत आणि पाकिस्तानसोबत हा संघ असेल. तर ‘ब’ गटात श्रीलंका, बांगला देश आणि अफगाणिस्तान हे संघ आहेत. 27 ऑगस्ट रोजी पहिला सामना ‘अ’ गटातील श्रीलंकाविरुद्ध अफगाणिस्तान असा खेळवला जाईल. तर दुसर्‍या दिवशी कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या भारतविरुद्ध पाकिस्तान संघामध्ये लढत होणार आहे.

आशिया कपचे सामने 6 संघांमध्ये खेळले जाणार आहेत; सध्या 5 संघांची निश्चिती झाली होती. आता पात्रता फेरी जिंकत या सामन्यांसाठीच्या सहाव्या संघाची निश्चिती झाली आहे. 21 ऑगस्टपासून पात्रता फेरी सामने सुरू झाले होते, हे सामने हाँगकाँग, कुवैत, यूएई आणि सिंगापूर या 4 संघांमध्ये खेळवले गेले. हे संघ प्रत्येकी 3-3 सामने खेळले आणि त्यातून तिन्ही सामने जिंकत हाँगकाँग संघ आशिया कप 2022 साठी पात्र ठरला.

हाँगकाँगचा पहिला सामना भारताविरुद्ध

हाँगकाँग या सत्रातील पहिला सामना भारतीय संघाविरुद्ध खेळणार आहे. 31 ऑगस्ट रोजी हा सामना खेळवला जाईल. यानंतर हाँगकाँग आपला दुसरा सामना 2 सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळेल, तर भारताचा पहिला सामना 28 ऑगस्ट रोजी पाकिस्तानविरुद्ध होईल.

Back to top button