करिअरपर्यायांचे वैविध्य | पुढारी

करिअरपर्यायांचे वैविध्य

पूर्वीच्या काळी करिअरसाठी पर्यायच मोजके होते; तेव्हा बहुतांश हुशार विद्यार्थी डॉक्टर, इंजिनिअर, केंद्रीय सेवा यांचीच निवड करायचे. पण आज मात्र विद्यार्थ्यांसमोर अनेक पर्याय आहेत.

बारावीनंतर एखाद्या खास विषयाची निवड ही विद्यार्थ्यांची आवड आणि उपलब्ध पर्याय यांच्यावर अवलंबून असते. कलाकार किंवा सर्जनशील असाल तर जाहिरात, फॅशन डिझायनिंगसारख्या कोर्सेसची निवड करू शकतो. काही वर्षांपूर्वीपर्यंत विज्ञान शाखेत वैद्यकीय आणि अभियांत्रिकी हे दोनच पर्याय होते, पण आता बायोटेक्नॉलॉजी, बायोइंजिनिअरिंग, फिजिओथेरेपी, ऑक्युपेशनल थेरेपी, मेडिकल ट्रान्सक्रिप्शनसारखे कोर्सेस करता येतात. त्याचप्रमाणे कला शाखेतील 12 वीच्या विद्यार्थ्यांना रिटेलिंग, हॉस्पिटॅलिटी, टूरिझम इंडस्ट्रीचादेखील भाग होता येईल. ज्या व्यक्ती सर्जनशील आहेत त्या फॅशन डिझायनिंग, मर्चंडायझिंग, स्टायलिंगचे कोर्सेस करू शकतात.

इतर अभ्यासक्रम –

नॅनो टेक्नॉलॉजी : 12 वीनंतर नॅनो तंत्रज्ञानात बीएस्सी किंवा बीटेक करून त्यानंतर त्याच विषयात पुढे एमएस्सी किंवा एमटेक करून या क्षेत्रात उत्तम करिअर करता येऊ शकते.

अंतराळ विज्ञान किंवा स्पेस सायन्स : यामध्ये तीन वर्षांचे बीएस्सी आणि 4 वर्षांचा बीटेक अभ्यासक्रमासह पीएच.डी.ही करता येते. इस्रो आणि बंगळुरातील आयआयएससीमध्ये यासाठीचे शिक्षण घेता येईल.

रोबोटिक सायन्स : रोबोटिक विज्ञानात एमईची पदवी मिळवलेल्या विद्यार्थ्यांना इस्रोसारख्या संस्थेमध्ये संशोधनाचे काम मिळू शकते.

अ‍ॅस्ट्रो फिजिक्स : या पदवी अभ्यासक्रमासाठी बीएस्सी फिजिक्सला प्रवेश घेऊ शकतो. अ‍ॅस्ट्रोफिजिक्समध्ये डॉक्टरेटनंतर विद्यार्थ्यांना इस्रोसारख्या संस्थेत वैज्ञानिक म्हणून काम करता येते.

डेअरी सायन्स : 12 वी नंतर विद्यार्थ्यांना 4 वर्षांचा डेअरी तंत्रज्ञानाचा पदवी अभ्यासक्रम करता येऊ शकतो. काही संस्था 2 वर्षांचा पदविका अभ्यासक्रमही चालवतात.

पर्यावरण विज्ञान : याअंतर्गत इकोलॉजी, डिझास्टर मॅनेजमेंट, वाईल्ड लाईफ मॅनेजमेंट, प्रदूषण नियंत्रण यांसारख्या विषयांचा अभ्यास करतात.

मायक्रो बायोलॉजी : बीएस्सी इन लाईफ सायन्स किंवा बीएस्सी इन मायक्रो बायोलॉजी कोर्स करू शकतो.

वॉटर सायन्स : जल विज्ञान त्यात हायड्रोमिटियोरोलॉजी, हायड्रोजियोलॉजी, ड्रेनेज बेसिन मॅनेजमेंट, वॉटर क्वालिटी मॅनेजमेंट, हायड्रोइन्फॉर्मेटिक्ससारख्या विषयांचा अभ्यास केला जातो.

फूटवेअर डिझाईन अँड डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटमध्ये फॅशन, डिझाईन, रिटेल आणि मॅनेजमेंट यातील पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रम करण्यासाठी ऑनलाईन परीक्षा द्यावी लागते.

काही हॉटेल मॅनेजमेंट संस्था फूड प्रॉडक्शनमध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचे आयोजन करतात. हे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर केवळ शेफ म्हणूनच नव्हे तर हॉटेल उद्योगाशी निगडित अन्य क्षेत्रांतही करिअर करू शकता. हॉटेल मॅनेजमेंट तसेच केटरिंग क्षेत्रात करिअर करण्यासाठी इच्छुकांना 12 वी उत्तीर्ण होणे गरजेचे ठरते.

सध्या बूमिंगमध्ये असलेल्या शेअर बाजाराच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी कमीत कमी वाणिज्य पदवी असणे आवश्यक आहे. अर्थात, इतरही विद्यार्थी स्टॉक ब्रोकर होऊ शकतात. यासाठी आपल्याला वित्त, व्यापार, अर्थशास्त्र, कॅपिटल मार्केट अकाऊंट, इन्व्हेस्टमेंट इत्यादींची चांगली समज आणि आवाका असणे गरजेचे आहे.

कला शाखेत जाणारे बहुतेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाच्या तयारीत असतात. त्याव्यतिरिक्त व्यवसाय म्हणून व्यवस्थापन, पत्रकारिता, शिक्षक, अँथ्रोपोलॉजी, ह्यूमन रिसोर्स, एमएसडब्ल्यू इत्यादी क्षेत्रांमध्येही भरपूर पर्याय उपलब्ध आहेत.

सुचित्रा दिवाकर

Back to top button