IND Vs ZIM : विजयी आघाडीचा भारताचा प्रयत्न, झिम्बाब्वे विरुद्ध आज दुसरा सामना | पुढारी

IND Vs ZIM : विजयी आघाडीचा भारताचा प्रयत्न, झिम्बाब्वे विरुद्ध आज दुसरा सामना

हरारे ; वृत्तसंस्था : भारत आणि झिम्बाब्वे (IND Vs ZIM) यांच्यातील तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज (शनिवारी) होणार आहे. गुरुवारी झालेला पहिला सामना भारताने दहा विकेटस्नी जिंकला होता. आता दुसरा सामना जिंकून मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असणार आहे.

टी-20 प्रारूपातील भारतीय संघाचा एक महत्त्वाचा खेळाडू असलेला राहुल आता झिम्बाब्वे संघाविरुद्धच्या मालिकेतून आपला फॉर्म परत मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे; परंतु त्याला पहिल्या सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली नाही. हर्नियाच्या शस्त्रक्रियेमुळे राहुल दोन महिन्यांनंतर संघात परतला होता; पण शिखर धवन आणि शुभमन गिल या दोघांनीच झिम्बाब्वेच्या आव्हानाचा फडशा पाडला.

भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड आणि नियमित कर्णधार रोहित शर्मा यांची नजर खासकरून राहुलवरच आहे. राहुल किती आणि कसा धावा बनवतो, याचा ते विचार करतील; कारण राहुलचा फॉर्म आगामी आशिया चषक, टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. पहिल्या सामन्यात राहुलला फलंदाजी करता आली नसली, तरी त्याने आपल्या नेतृत्व गुणाचे चांगले प्रदर्शन केले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करीत खेळपट्टीमधील बाऊन्सचा फायदा उठवण्याचा त्याचा निर्णय कमालीचा यशस्वी ठरला. भारतीय वेगवान गोलंदाजांनी पहिल्या अकरा षटकांतच झिम्बाव्वेचे कंबरडे मोडून विजयाची पायाभरणी केली.

झिम्बाब्वेने हरारे स्पोर्टस् क्लबवर नुकतेच 300 आणि 290 धावांचा पाठलाग करताना बांगला देशला पराभूत केले होते. पाकिस्तानच्या नाकात दम आणला होता; परंतु भारताच्या युवा गोलंदाजांपुढे त्यांनी नांगी टाकली. हाच परफॉर्मन्स भारताने दुसर्‍या सामन्यात दाखल्यास विजय अवघड नाही. भारतासाठी पहिल्या सामन्यात एकच चिंतेची बाब म्हणजे झिम्बाब्वेच्या शेपटाचे वळवळणे. डेथ ओव्हर स्पेशालिस्ट बनण्याचे स्वप्न पाहणार्‍या हर्षल पटेलला तब्बल 50 धावा ठोकल्या गेल्या. यावर संघाला विचार करावा लागेल. (IND Vs ZIM)

दुसरीकडे, बांगला देशला पराभूत केल्यानंतर भारताला कडवी लढत देण्याचा प्रयत्न झिम्बाब्वेचा संघ करील, असे वाटले होते; परंतु पहिल्या सामन्यात त्यांनी एकतर्फी पराभव स्वीकारला. यजमान संघाला सिकंदर रजा, रेजिस चकाब्वा आणि इनोसेंट केईया यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. निदान दुसर्‍या सामन्यात तरी संघ चांगली लढत देईल, अशी त्यांच्या देशवासीयांना अपेक्षा आहे.

Back to top button