नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : येत्या 27 ऑगस्टपासून आशिया चषक 2022 क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा श्रीलंकेत होणार होती; परंतु तेथील राजकीय परिस्थितीमुळे स्पर्धा स्थलांतरित करावी लागली. ही स्पर्धा असो किंवा टी-20 चा वर्ल्डकप असो अथवा आयपीएल असो, त्या-त्या देशांत स्पर्धा भरवण्यात अपयश आले की, पर्यायी व्यवस्था म्हणून पहिले नाव येथे ते यूएई अर्थात संयुक्त अरब अमिरातचे. या देशाने हा विश्वास, हा लौकिक स्वत:च्या परिश्रमाने आणि दूरद़ृष्टीने कमावला आहे.
वाळवंटी देश म्हणून संयुक्त अरब अमिरातचे काही वर्षांपूर्वी जगाच्या पाठीवर खेळाविषयी नोंद घ्यावे, असे विशेष कोणतेही योगदान नव्हते; पण आज ते जगातील स्पोर्टस् हब बनले आहे. क्रिकेट, फुटबॉल, फॉर्म्युला वन, टेनिस, गोल्फ आणि यूएफसी (अल्टिमेट फायटिंग चॅम्पियनशिप) यांच्या आयोजनात त्यांनी आपली क्षमता दाखवून जगाला थक्क करून सोडले आहे. तसे पाहिले, तर येथील स्थानिक लोकांमध्ये फुटबॉलवेड चांगले आहे. येथे अनेक फुटबॉल मैदाने आणि फुटबॉल क्लब आहेत; पण व्यवसायाच्या निमित्ताने येथे असलेल्या भारतीय उपखंडातील लोकांमुळे येथे क्रिकेटसारखा खेळही लोकप्रिय झाला आहे. तेथील सरकारने या क्षेत्रातील संधी ओळखून सर्व खेळांसाठी सर्वसुविधांनीयुक्त ठिकाण बनवले आहे. या प्रदेशाला जगातील खेळाची राजधानी म्हटले, तर वावगे ठरणार नाही.
गेल्या काही वर्षांमध्ये अनेक प्रमुख जागतिक क्रीडा स्पर्धांसाठी हक्काचे ठिकाण म्हणून यूएईकडे बघितले जाऊ लागले आहे. भारताच्या द़ृष्टीने विचार केला, तर भारताने आतापर्यंत अनेक क्रिकेट स्पर्धांसाठी यूएईचा वापर केला आहे. अगदी अलीकडील उदाहरण घ्यायचे झाले, तर 2021 इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेचे घेता येईल. कोव्हिड-19 च्या वाढत्या संकटामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) संपूर्ण स्पर्धाच यूएईला नेली होती. त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) देखील टी-20 विश्वचषकासाठी यूएईची निवड केली. गेल्या काही वर्षांमध्ये यूएईने अशा अनेक क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले आहे. याचीच परिणती म्हणून डिसेंबर 2020 मध्ये अबूधाबीला जगातील आघाडीच्या क्रीडा पर्यटनस्थळाचा पुरस्कार मिळाला.
सर्वात प्रतिष्ठेच्या टेनिस स्पर्धांचेही झाले यशस्वी आयोजन
दुबई हे 'वूमन्स टेनिस असोसिएशन' आणि 'असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्स' या सर्वात श्रीमंत टूर इव्हेंटस्चे आयोजन करते. 2020 मधील डब्ल्यूटीए प्रीमिअर इव्हेंटची एकूण बक्षीस रक्कम कोट्यवधी रुपये असते. विशेष म्हणजे, या दोन्ही स्पर्धांमध्ये मार्टिना हिंगिस, व्हिनस विल्यम्स, अँडी रॉड्रिक, पेट्रा क्विटोव्हा, कॅरोलिन वोझ्नियाकी, रॉजर फेडरर, राफेल नदाल आणि नोव्हाक जोकोव्हिच यांनाही आकर्षित केले आहे.
क्रीडा संस्कृती रुजण्यास क्रिकेट ठरले कारण
यूएईच्या जागतिक क्रीडा केंद्र बनण्याच्या प्रवासाची सुरुवात क्रिकेटपासून झाली. 1980 च्या दशकाच्या सुरुवातीला यूएईतील शारजाह येथे क्रिकेट स्टेडियम तयार झाले. 6 एप्रिल 1984 रोजी या ठिकाणी पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला. हा सामना पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात खेळला गेला होता. त्यानंतर अनेकदा शारजाहमध्ये क्रिकेटचे सामने झाले. मात्र, खरी प्रसिद्धी मिळाली ती 1998 च्या तिरंगी मालिकेमुळे. 1998 साली शारजाहमध्ये ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि भारत यांच्यातील तिरंगी मालिका आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा सचिन तेंडुलकरने पाठोपाठ केलेल्या शतकांमुळे 'डेझर्ट स्टॉर्म' म्हणून प्रसिद्ध आहे. यूएई हे पाकिस्तानच्या क्रिकेट संघासाठी 'दुसरे घर' मानले जाते. विशेषत:, आंतरराष्ट्रीय बंदीच्या काळात पाकिस्तानला आपल्या देशात सामने आयोजित करण्यास मनाई केली गेली होती. त्यावेळी पाकिस्तान क्रिकेटला यूएईचा आधार मिळाला होता. जागतिक क्रिकेटची प्रशासकीय संस्था असलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे मुख्यालय दुबईमध्ये आहे, ही सर्वात महत्त्वाची बाब आहे.
फॉर्म्युला वन रेस
2009 मध्ये अबूधाबी ग्रँड प्रिक्स ही फॉर्म्युला वन स्पर्धा सुरू करण्यात आली. उद्घाटनाच्या वर्षापासूनच या स्पर्धेने फॉर्म्युला वन कॅलेंडरमध्ये स्थान मिळवलेले आहे. विशेष म्हणजे, यूएईचा स्वत:चा एकही निष्णात मोटारस्पोर्टस् ड्रायव्हर तयार झालेला नाही. असे असूनही ही स्पर्धा तिथे लोकप्रिय झाली आहे. याशिवाय, फुटबॉल, टेबल टेनिस आणि गोल्फ या खेळांच्या क्रीडा स्पर्धाही यूएईने आजवर यशस्वीपणे आयोजित केलेल्या आहेत. त्यामुळेच देशाचे स्वत:चे खेळाडू नसूनही यूएईने जागतिक क्रीडा क्षेत्रामध्ये आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. येथील अत्याधुनिक क्रीडा सुविधांमुळे येथे जागतिक स्तराच्या क्रीडा स्पर्धा आयोजित करणे सोयीचे होते.