तुमचा खेळ देशासाठी प्रेरणादायी : पंतप्रधान नरेंद्र मोदी | पुढारी

तुमचा खेळ देशासाठी प्रेरणादायी : पंतप्रधान नरेंद्र मोदी

दिल्ली ; वृत्तसंस्था : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव समारंभाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच राष्ट्रकुल स्पर्धेत यश संपादन केलेल्या खेळाडूंशी शनिवारी संवाद साधला. यावेळी पदक जिंकलेल्या आणि सहभागी झालेल्या सर्वांचे त्यांनी अभिनंदन केले. भारतीय खेळाडू नव्या नव्या खेळात प्रावीण्य मिळवत आहेत, असे पंतप्रधान म्हणाले आहेत.

बर्मिंगहॅममध्ये नुकत्याच संपन्न झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा सोहळ्यात भारताच्या पथकाने दणकून 61 पदके लुटून आणली, त्यातली 22 सुवर्णपदके आहेत. भारताच्या मुलींनी आणि नव्या खेळाडूंनीही चांगले प्रदर्शन केले आहे. हा तुमचा खेळ देशासाठी प्रेरणादायी आहे, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी त्यांचे कौतुक केले.

भारतीय खेळाडू हे कोणत्याही खेळासाठी तत्पर असतात. दरम्यान, ज्या खेळाडूंचे थोडक्यात पदक हुकले, त्यांनी भारताची माफी मागण्याची गरज नाही. तुम्ही देशासाठी विजेते आहात. फक्त तुम्ही आपला खेळ इमानदारीने खेळा. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारतीय मुलींनी रौप्यपदक जिंकले असून तुमचे हे यश भारतातील प्रत्येक मुलीसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास मोदींनी दिला आहे. या सोहळ्यात क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी झालेले सर्व खेळाडू उपस्थित होते.

Back to top button