निवड समिती माझा पुढच्या वेळी नक्की विचार करेल : ईशान किशन | पुढारी

निवड समिती माझा पुढच्या वेळी नक्की विचार करेल : ईशान किशन

मुंबई ; वृत्तसंस्था : आगामी आशिया चषक स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघातून ईशान किशन याला संधी न दिल्याने माजी खेळाडूंसह अनेक जाणकारांनी आश्चर्य व्यक्त केले. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्याविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेत ईशानला केवळ प्रत्येकी 1 सामना खेळण्याची संधी दिली. सलामीवीर म्हणून बॅक अपसाठी ईशान हा योग्य पर्याय असल्याचे अनेकांचे मत आहे आणि डावखुर्‍या फलंदाजाने मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने करून ते सिद्धही केले आहे.

त्याला आशिया चषक स्पर्धेसाठीच्या संघात निवडायला हवे होते, असे क्रिकेट तज्ज्ञांचे मत आहे. अशात ईशान किशननेही निवड न झाल्याबाबत त्याचे मत मांडले आहे. ईशान किशन म्हणाला, जे काही घडले ते योग्य होते खेळाडूंची निवड करण्यापूर्वी निवड समिती खूप विचार करते. निवड न होण्याकडे मी सकारात्मक द़ृष्टीने पाहतो. मी अजून मेहनत घेऊन निवड समितीचा आत्मविश्वास जिंकेन. जेणेकरून ते पुढच्या वेळेस माझी निवड करतील.

Back to top button